Jake Fraser-McGurk Ruled Out Of IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना येत्या १७ मेपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना ३ मे रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, अजूनही प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते? हे अजूनही कळू शकलेलं नाही. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासाठी प्लेऑफची दारं उघडी आहेत. दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज या हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा देखील करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या खेळाडूची दिल्लीच्या ताफ्यात एन्ट्री
आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज जेक फ्रेजर मॅकगर्क या हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून बांगलादेशचा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात स्थान देण्यात आलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्याला ६ कोटी देऊन संघात स्थान दिलं गेलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली गेली आहे. मुस्तफिजुर रहमान संघात आल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची ताकद दुपटीने वाढली आहे. इथून पुढील सामने दिल्लीसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत.
दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन
जेक फ्रेजर मॅकगर्क संघातून बाहेर पडणं हा दिल्लीसाठी मोठा धक्का आहे. कारण त्याने संघासाठी महत्वपूर्ण धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मुस्तफिजुर रहमान दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. मुस्तफिजुर रहमानच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आतापर्यंत १०६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १३२ गडी बाद केले आहेत. यादरम्यान १० धावा खर्च करून ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ५७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने ६१ गडी बाद केले आहेत.
तर २९ धावा खर्च करून ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी मिचेल स्टार्कने ही जबाबदारी पार पाडली होती. आता स्टार्क उर्वरीत सामने खेळण्यासाठी परत येणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे स्टार्कच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मुस्तफिजुर रहमानच्या खांद्यावर असेल.
दिल्ली कॅपिटल्सकडे प्लेऑफ गाठण्याची संधी
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. दिल्लीने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला ६ सामने जिंकता आले आहेत. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. दिल्लीने आतापर्यंत १३ गुणांची कमाई केली आहे. दिल्लीला जर प्लेऑफ गाठायचं असेल, तर इथून पुढे सर्व सामने जिंकावे लागतील.