आयपीएल २०२५ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील ५८ सामने पूर्ण झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानातील तणावाची स्थिती पाहता, ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सुधारीत वेळापत्रकानुसार, ही स्पर्धा १७ मेपासून सुरू होणार आहे. गुजरातचा संघ गुणतालिकेत सर्वाच्च स्थानी असून प्लेऑफमध्ये जाण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. दरम्यान या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघातील प्रमुख फलंदाज जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र, भारत- पाकिस्तानातील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील फायनलचा सामना ३ मे रोजी खेळवला जाणार आहे.

जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडणार?

गुजरात टायटन्स संघाला ३ फलंदाजांनी स्पर्धेत टिकवून ठेवलं आहे. सलामीला येणारे गिल आणि सुदर्शन आणि त्यानंतर जोस बटलर. या तिघांनी मिळून सर्व संघांची वाट लावली. गुजरातला प्लेऑफमध्ये जाण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र, प्लेऑफच्या सामन्यांवेळी बटलर गुजरातकडून खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २९ मे पासून मर्यादीत षटकांची मालिका रंगणार आहे. या मालिकेत बटलर इंग्लंडकडून खेळताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे त्याला प्लेऑफचे सामने खेळता येणार नाही. गुजरातचा सध्याचा फॉर्म पाहता, हा संघ फायनलमध्येही प्रवेश करू शकतो.

या विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते संधी

द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज कुसल मेंडिसला संघात संधी दिली जाऊ शकते. मेडिंस हा या हंगामात रिल्पेस होऊन आयपीएलमध्ये प्रवेश करणारा श्रीलंकेचा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दासून शनाकाला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली होती. त्याला ग्लेन फिलिप्सच्या जागी संधी दिली होती.

कुसल मेडिंस देखील आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. सध्या तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळून आला आहे. आयपीएलसह पीएसएल स्पर्धा देखील एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. या स्पर्धेला देखील १७ मे पासून सुरुवात होणार आहे. आता तो पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरीत सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार? की बटलरच बदली खेळाडू म्हणून भारतात येणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.