Canadian Rapper Drake Bets on RCB : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये मंगळवारी (३ जून) यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जगभरातील क्रिकेटरसिकांना या सामन्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जगभरात या सामन्यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अंतिम सामन्यापूर्वी एका जगप्रसिद्ध गायकाने बँगलोरच्या विजयाची आशा व्यक्त करत या संघावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावला आहे. त्याने सट्ट्याची पावती (रिसिप्ट) देखील समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.
समाजमाध्यमांवर ‘ई साला कप नामदे’ (यावर्षी चषक आमचाच आहे) हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे आणि कॅनेडियन रॅपर ड्रेक देखील या मोहिमेत सहभागी झाला आहे. तो देखील आजच्या सामन्यात बँगलोरचं समर्थन करतोय. तसेच ड्रेकने आरसीबीवर लाखो डॉलर्सचा सट्टा लावला आहे. जगातील काही देशांमध्ये सट्टा अधिकृत आहे. तिथले लोक पाच डॉलर्सपासून लाखो डॉलर्सपर्यंत सट्टा लावतात. अलीकडच्या काळात क्रिकेट सामन्यांवरही सट्टा लावण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये ड्रेकचाही समावेश आहे.
विराटचा संघ जिंकल्यास ड्रेकला मिळणार इतकी रक्कम
ड्रेकने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्याने स्टेकवर (सट्टा लावण्यासाठीचं संकेतस्थळ) आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ७,५०,००० डॉलर्सचा (६,४१,०८,९७४) सट्टा लावल्याची माहिती दिली आहे. त्याने रिसिप्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. दरम्यान, विराट कोहलीचा संघ या सामन्यात जिंकला तर ड्रेकला १.३१२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११,२१,५७,६९७ रुपये मिळतील. त्यामुळे ड्रेकने कॅप्शनमध्ये ‘ई साला कप नामदे’ असं म्हटलं आहे. कॅनडा किंवा अमेरिकेत क्रिकेट फार लोकप्रिय नाही तरीदेखील ड्रेकचा इतका उत्साह आणि सट्ट्यात लावलेली रक्कम पाहून त्याचे जगभरातील चाहते अचंबित झाले आहेत.
गेल्या वर्षीसुद्धा ड्रेकने सट्टा लावला होता
ड्रेकने गेल्या वर्षीच्या आयपीएल फायनल सामन्यावरही सट्टा लावला होता. गेल्या वर्षी आयपीएलचा अंतिम सामना कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. त्यावेळी ड्रेकने कोलकाता संघावर सट्टा लावला होता. त्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली होती. यावर्षी ड्रेकने बँगलोरवर सट्टा लावला आहे. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं आहे की यावर्षी देखील ड्रेकचा अंदाज बरोबर ठरेल आणि विराट कोहलीचा संघ विजयी होईल. ड्रेकचा अंदाज किती बरोबर ठरतो ते काही तासांत संपूर्ण जगाला कळेल.