Rohit Sharma Speaks About Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात आपल्या संघासह राहत नसल्याची कबुली अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिली आहे. हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलेल्या रोहितने ‘क्लब प्रेरी फायर’ या पॉडकास्टवर खुलासा करत सांगितले की, “वानखेडेवरील सामन्यांदरम्यान मी संघासह हॉटेलमध्ये राहत नाही, त्याऐवजी मुंबईतील माझ्या घरी कुटुंबासह राहतो मुंबई इंडियन्सचे शेवटचे चार सामने मुंबईत वानखेडेवर झाले तेव्हा मी घरीच होतो. आमची टीम मीटिंग असते त्याच्या एक तासभर आधी मी संघाला भेटतो. हे पण चांगलं आहे, खरंतर थोडं वेगळं आहे पण चांगलंय की माझ्या हातात आता खूप वेळ आहे आणि मला कुटुंबाबरोबर राहणं शक्य होतंय “.

यंदाच्या आयपीएल हंगामात रोहित शर्मावर कर्णधार पदाचा ताण नसल्याने त्याचा फॉर्म सुद्धा अगदी बेधडक झाल्याचे पाहायला मिळतेय. मुंबईत चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लीगमध्ये १२ वर्षांतील पहिले शतक झळकावून त्याने अर्धशतकाचा दुष्काळ संपवला होता. अर्थात तो नाबाद राहिला, शतक केलं तरी, त्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं ही बाब वेगळी. पण एकूणच खेळीदरम्यान रोहितच्या गतीने सर्वांनाच थक्क केलं होतं. १६७-प्लस स्ट्राइक रेटने सध्या रोहित शर्मा सामने खेळतोय जे खरंतर विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतासाठी खूपच फायद्याचं आहे.

हे ही वाचा<< मुंबई इंडियन्ससमोर गुडघे टेकताच पंजाब किंग्सने मराठीत मांडली व्यथा; सामनाच नाही तर ‘हे’ स्थानही गमावलं

दरम्यान, रोहित शर्माच्या आयपीएलमधील रेकॉर्ड्सबद्दल सांगायचं झाल्यास, १८ एप्रिलला गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) झालेला मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना रोहित शर्माच्या आयपीएलमधील कारकिर्दीतील २५० वा सामना होता. एमएस धोनीनंतर २५० आयपीएल सामने खेळणारा रोहित दुसरा खेळाडू ठरला. तर रोहित शर्माच्या आयपीएलमधील धावांच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झाल्यास, रोहितने आयपीएलमध्ये ३०. १० च्या सरासरीने आणि १३१.२२ च्या स्ट्राइक रेटने ६४७२ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि ४२ अर्धशतके झळकावली आहेत.