Kolkata Knight Riders vs Gujarat Titans IPL Latest Score Update : आयपीएल २०२३ चा ३९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ईडन गार्डनमध्ये रंगला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ विकेट्स गमावत १७९ धावांपर्यंत मजल मारली होती. रहमानउल्ला गुरबाजने ३९ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी करत कोलकाताच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. त्यानंतर बर्थडे बॉय आंद्रे रसेलने १९ चेंडूत ३४ धावा कुटल्या. दरम्यान, १८० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी केली. विजय शंकरने २४ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीनं ५१ धावांची नाबाद खेळी केली. शुबमन गिलने ४९ धावा कुटल्या तर डेव्हिड मिलरने १८ चेंडूत ३२ धावांची खेळी करत गुजरात टायटन्सला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला.

गुजरात टायटन्ससाठी ऋद्धीमान साहाने फक्त १० धावा केल्या. गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने चौफेर फटकेबाजी करत ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्या २० चेंडूत २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर विजय शंकर आणि डेव्हिड मिलरने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कोलकातासाठी सुनील नारायण, हर्शीत आणि आंद्रे रसलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

कोलकाताचे सलामीवीर फलंदाज एन जगदिशन आणि गुरुबाजने चांगली सुरुवात केली होती. मात्र, तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीने जगदिशनला १९ धावांवर बाद केलं आणि कोलकाताला पहिला धक्का बसला. परंतु, त्यानंतर गुरुबाजने चौफेर फटकेबाजी करत मैदानात धावांचा पाऊस पाडला. गुरुबाजने ३९ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारली. नूर अहमदच्या गोलंदाजीवर गुरुबाज बाद झाला आणि केकेआरला मोठा धक्का बसला. शामीने शार्दुल ठाकूरला शून्यावर बाद केलं. त्यानंतर जोशूआ लिटिलने व्येंकटेश अय्यरला ११ धावांवर बाद केलं. कर्णधार नितीश राणालाही ४ धावांवर असताना लिटिलने झेलबाद केलं. रिंकू सिंग १९ धावांवर असताना नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर मोहम्मद शामीने आंद्रे रसलला ३४ धावांवर बाद केलं.