आयपीएलच्या इतिहासातील चार मोठ्या धावसंख्या उभारणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरविरूद्ध मोठी कामगिरी केली. हैदराबादने केकेआरविरूद्ध आयपीएल २०२५ च्या अखेरच्या सामन्यात २७८ धावा करत तिसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. हैदराबादच्या या धावसंख्येत हेनरिक क्लासेनने शतक झळकावत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या शतकी खेळीनंतर क्लासेन नेमकं काय म्हणाला.
हैदराबादसाठी शेवटच्या सामन्यात हेनरिक क्लासेनची बॅट तळपली. २३ कोटींना रिटेन केलेल्या क्लासेनने आपला क्लास दाखवला. क्लासेनने ३७ चेंडूत आयपीएलच्या इतिहासातील तिसरे सर्वात जलद शतक झळकावले आणि हैदराबादसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
केकेआरविरुद्ध हेनरिक क्लासेनने ३७ चेंडूत शतक झळकावले आणि ३९ चेंडूत सात चौकार आणि नऊ षटकारांसह १०५ धावा करून नाबाद परतला. यानंतर, जेव्हा क्लासेनला त्याच्या वादळी खेळीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “संपूर्ण हंगामातील निराशाजनक कामगिरीनंतर, नशीबाने मला सूर गवसला आणि अशा खेळीमुळे मोठा दिलासा मिळाला. मी सातत्याने प्रयत्न करत राहिलो. फ्रँचायझीने खूप वेळ आणि पैसा खर्च केला आहे, त्यामुळे मैदानावर त्यांच्या क्रिकेटचा ब्रँड टिकवून ठेवणे हे आमचे काम आहे.”
पुढे क्लासेन म्हणाला, “प्रत्येक चेंडूवर षटकार खेचण्याचा माझा प्रयत्न होता. नरेनचा एक स्पेल होता जिथे मोठे फटके खेळणं अवघड झालं होतं पण मी तिथे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.”
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवल्याबद्दल क्लासेन म्हणाला, “मी संघाची गरज पाहून परिस्थितीप्रमाणे खेळणारा खेळाडू आहे, डगआऊटमधून मला या क्रमांकावर पाठवण्याची कल्पना आली. जर आपण पॉवरप्लेनंतर किंवा पॉवरप्लेच्या शेवटी विकेट गमावली तर मी फलंदाजीला जाईन. जर आपण लवकर विकेट गमावली तर मी लवकर जाणं फारस सोयीचं ठरणार नाही. माझ्यासाठी, फलंदाजीला एखाद्या क्रमांकावर जाणं फक्त एक आकडा आहे, ते सर्व संघाच्या परिस्थितीवर अवलंबून असते.”
आयपीएलमधील सर्वात जलद शतक
३० चेंडू – ख्रिस गेल (आरसीबी) बेंगळुरू, २०१३
३५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (आरआर) जयपूर, २०२५
३७ चेंडू – युसूफ पठाण (आरआर), मुंबई, २०१०
३७ चेंडू – हेनरिक क्लासेन (एसआरएच) दिल्ली, ३०३५
३८ चेंडू – डेव्हिड मिलर (पीबीकेएस), मोहाली, २०१३
हैदराबादने उभारली IPL इतिहासातील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या
सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने १०९ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्याशिवाय, ट्रॅव्हिस हेडनेही ४० चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांसह ७६ धावा केल्या. यासह, हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासात २७८ धावांची तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. आता, आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च ४ धावसंख्या (२८७, २८६, २७८ आणि २७७) हैदराबादच्या नावावर आहेत. तर यानंतर, केकेआरच्या नावावर एकूण २७२ धावा आहेत, ज्या त्यांनी या हंगामात दिल्लीविरुद्ध केल्या.
© IE Online Media Services (P) Ltd