आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात केकेआरने दणदणीत विजय मिळवला आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात केकेआरच्या सर्वच खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत विजयाला गवसणी घातली. दरम्यान केकेआरचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनची सर्वत्र वाहवा होत आहे. रॉबिन उथप्पाला बाद करण्यासाठी त्याने केलेल्या स्टंंम्पिंगची दखल थेट मास्टर ब्लास्टर सचिनने घेतली आहे.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईचा एकही खेळाडू खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. ऋतुराज गायकवाड तर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वेच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लय सापडण्याआधीच उथप्पा वरुण चक्रवर्तीने फेकलेल्या चेंडूमुळे गोंधळला आणि यष्टीक्षक शेल्डन जॅक्सनने कशाचाही विलंब न करता विद्युतवेगाने उथप्पाला बाद केले. त्याची हीच कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.
That was an outstanding stumping. @ShelJackson27’s speed reminded me of @msdhoni.
Lightning fast!! ⚡️#CSKvKKR— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 26, 2022
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जॅक्सनने केलेल्या यष्टीरक्षणाची वाहवा केली आहे. तसेच जॅक्सनची गती पाहून मला महेंद्रसिंह धोनीच्या यष्टीरक्षणाची आठवण झाली, असे सचिन तेंडुलकने म्हटलेय.