IPL 2025 Umpire who’s Singer: आयपीएल २०२५ मध्ये सर्व संघांमध्ये प्लेऑफसाठी अटीतटीची शर्यत सुरू आहे. आयपीएलच्या लीग टप्प्यात ५५ सामने झाले असून तीन संघ स्पर्धेबाहेर झाले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. यादरम्यान भारताचा एक अंपायर चर्चेत आला आहे, ज्याची पहिल्यांदा आयपीएलसाठी निवड करण्यात आली आहे. चकित करणारी गोष्ट म्हणजे हा अंपायर गायकसुद्धा आहे.

आयपीएल २०२५ दरम्यान भारताचा एक अंपायर चांगलाच चर्चेत आला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पंचाने आधीच गायक म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि इंडियन आयडल सारख्या मोठ्या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये आपली छाप पाडली. जेव्हा आयपीएल सुरू झाली तेव्हा अंपायर संगीत विश्वात आपली ओळख निर्माण करत होते आणि १७ वर्षांनंतर, तो आता आयपीएलचा भाग आहे.

कोण आहे आयपीएलमधील सिंगर अंपायर?

सध्या चर्चेत असलेल्या या अंपायरचं नाव पराशर जोशी आहे. पराशर जोशी जो एक गायक आहे आणि अंपायरदेखील आहे. पराशर जोशीचा आयपीएलपर्यंतचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. पराशर जोशी हा मूळचा पुण्याचा आहे. तो २००८ मध्ये इंडियन आयडलच्या चौथ्या सीझनमध्ये दिसला होता. त्यानंतर तो पियानो राउंडपर्यंत पोहोचला, त्यानंतर तो शोमधून बाहेर पडला.

पराशर जोशीने यापूर्वी त्यांना सलग तीन वर्षे नकाराचा सामना करावा लागला होता. याचबरोबर पराशर जोशीही क्रिकेट खेळायचा, तो क्लब पातळीवर खेळला आहे. पण बऱ्याच वर्षांनी त्याने पंचगिरीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. पराशर जोशीने रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफी सारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये अंपायर म्हणून काम केले आहे.

आयपीएलपूर्वी, २०२४ मध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) मध्येही पराशर जोशी पंचगिरी करताना पाहण्यात आलं होतं. त्याच वेळी, २०१५ मध्ये पराशरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पंच पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. पराशर जोशीने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी, २४ लिस्ट-ए आणि ३० टी-२० सामन्यांमध्ये फील्ड पंच म्हणून भूमिका बजावली आहे. याशिवाय, तो १ प्रथम श्रेणी, १ लिस्ट-ए आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणूनही काम करत आहे.

५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातून पराशर जोशी यांचे आयपीएलमध्ये पंच म्हणून पदार्पण झाले. २०२४ च्या सुरुवातीला, महिला प्रीमियर लीग दरम्यान, ते व्हायरल झाले होते. त्यानंतर चाहत्यांनी त्याची तुलना क्रिकेटपटू श्रेयस अय्यरशी केली होती. खरंतर चाहत्यांना तो अय्यरसारखा दिसतो असे वाटत होते. एवढंच नाही तर पराशर अजूनही अंपायरिंगसह गायक म्हणूनही काम करतो.