KKR vs CSK Match Updates: आयपीएल २०२३ मधील ६१ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात केकेआरने रिंकू सिंग आणि नितीश राणा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सीएसकेचा ६ गडी राखून पराभव केला. सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा केल्या.
केकेआरने पहिल्या ६ षटकात ३ गडी गमावले –
१४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. केकेआरला डावाच्या पहिल्याच षटकात ४ धावांवर पहिला धक्का बसला.रहमानउल्ला गुरबाजच्या एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर कोलकाताला दुसरा धक्का व्यंकटेश अय्यरच्या रूपाने २१ धावांवर बसला. जो ९ धावा करून बाद झाला. ३३ धावांवर कोलकाताला तिसरा धक्का जेसन रॉयच्या रूपाने बसला. केकेआर संघाला पहिल्या ६ षटकात ३ विकेट गमावून ४६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
नितीश-रिंकूच्या भागीदारीने केकेआरचा एकतर्फी विजय –
पहिल्या ६ षटकांत ३ गडी गमावल्यानंतर कोलकाताचा डाव कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी सांभाळत संघाची धावसंख्या १० षटकांत ६७ धावांवर नेली. येथून रिंकूने एका टोकाकडून वेगाने धावा काढण्याची सुरूवात केली. रिंकू सिंगने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत या सामन्यात ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
या सामन्यात ४३ चेंडूत ५४ धावा करून रिंकू धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. नितीश राणा आणि रिंकू यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७६ चेंडूत ९९ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. नितीश राणा सामन्यात ५७ धावांची नाबाद इनिंग खेळून परतला आणि संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. चेन्नई सुपर किंग्जकडून दीपक चहरने गोलंदाजीत ३ बळी घेतले.
हेही वाचा – RR vs RCB: मागील हंगामातील हिरो जोस बटलर यंदा ठरला झिरो, विजयानंतर आरसीबीने लावली अनेक विक्रमांची रांग
शिवम दुबेने चेन्नईसाठी सर्वाधिक ४८ धावांची खेळी साकारली –
या सामन्यातील चेन्नई सुपर किंग्जच्या खेळीबद्दल बोलायचे झाले, तर शिवम दुबेच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. चेन्नई संघाने एका सामन्यात ७२ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. शिवमने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले. शिवम दुबेने नाबाद ४८ धावांची खेळी केली. केकेआरकडून सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने २-२ बळी घेतले.
