KKR vs RR Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेतील ५३ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ४ गडी बाद २०६ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावा करायच्या होत्या. राजस्थानकडून धावांचा पाठलाग करताना रायन परागने पूर्ण जोर लावला. मात्र राजस्थानचा संघ विजयापासून १ धाव दूर राहिला.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आंद्रे रसेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने २०६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. मात्र, शेवटी कोलकाताचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांवर भारी पडले.
राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने चांगली सुरूवात करून दिली. यशस्वीने ३४ धावा केल्या. मात्र त्याला वैभव सूर्यवंशीकडून हवी तशी साथ मिळाली नाही. वैभव अवघ्या १४ धावांवर तंबूत परतला. धावांचा पाठलाग करताना कर्णधार रियान परागची बॅट तळपली. हंगामाच्या शेवटी अखेर रियान पराग फॉर्ममध्ये परतला. त्याने या डावात ४५ चेंडूत ९५ धावांची खेळी केली.
यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ८ षटकार खेचले. यादरम्यान रियानने खणखणीत ६ षटकार खेचले. शेवटी शिमरोन हेटमायरने २९ धावा चोपल्या. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. कोलकाताच्या फलंदाजाने फटका मारला होता. मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. त्यामुळे कोलकाताने हा सामना केवळ १ धावेने आपल्या नावावर केला.
कोलकाताने उभारला २०६ धावांचा डोंगर
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०६ धावांचा डोंगर उभारला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने ३५ धावांची खेळी केली. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने ३० धावांची खेळी केली. या डावात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या अंगकृश रघुवंशीने ४४ धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेलने नाबाद ५७ धावांची खेळी केली. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे.