Fan Emotional Video After GT vs MI Match : आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २२९ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला २०८ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह मुंबई इंडियन्सने हा सामना २० धावांनी जिंकून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. मुंबईचा क्वालिफायर २ चा सामना पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. १४ पैकी ९ सामने जिंकून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे गुजरातला आयपीएल जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र, गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ही कामगिरी पाहून गुजरात टायटन्स संघाचे चाहते निराश झाले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या हाय स्कोअरिंग सामन्यातही गुजरातचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये सामना मुंबईच्या बाजूने झुकला. या पराभवानंतर गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले.

गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना अश्रू अनावर

गुजरात टायटन्स संघाने हा सामना अवघ्या २० धावांनी गमावला. सामना गमावल्यानंतर, एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. हा चिमुकला आपले अश्रू पुसताना दिसून येत आहे. तर आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात गुजरात टायटन्स संघातील खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सचा दमदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली. तर या हंगामातील आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची दमदार सलामी दिली.

सूर्यकुमार यादवने ३३, तिलक वर्माने २५ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २२ धावांची खेळी करत मुंबईला २२८ धावांपर्यंत पोहोचवलं. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा चोपल्या. मात्र, गुजरातचा संघ विजयापासून २० धावा दूर राहिला.