CSK vs LSG Match Highlights: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी एमएस धोनीला लखनऊ सुपर जाएंट्सच्या विरुद्ध शेवटच्या तीन षटकात मैदानात उतरवण्याचे खरे कारण उघड केले आहे. धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईची स्थिती १४२ धावांना ६ विकेट्स अशी होती. शेवटची दोन षटके शिल्लक असताना धोनी मैदानात आला असला तरी त्याची जादू मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळालीच. अवघ्या ९ चेंडूंमध्ये त्याने २८ धावा करून सर्वांना थक्क केले. पण धोनीचा फॉर्म इतका तगडा असतानाही त्याला आधी फलंदाजीला का पाठवले नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, त्यावर उत्तर देताना स्टीफन फ्लेमिंग यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आहे.

.. म्हणून आम्ही धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देतो!

फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “धोनी अजूनही गुडघ्याच्या त्रासातून पूर्ण बरा झालेला नाही. गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या समाप्तीनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. असं असतानाही धोनीची या हंगामातील फलंदाजी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. प्री सीझनमध्ये सुद्धा त्याचा फॉर्म कमाल होता त्यामुळे आताचे त्याचे शॉट्स पाहून संघाला निश्चितच आश्चर्य वाटलेले नाही. यापूर्वीच्या काही सीझनमध्ये धोनी गुडघ्याच्या समस्यांनी त्रस्त होता अजूनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही त्यामुळे तो मर्यादित चेंडूंसाठी चांगला खेळू शकतो पण त्यापेक्षा जास्त वेळ खेळावं लागल्यास त्याला त्रास होऊ शकतो. आम्हाला त्याची गरज आहे, सगळ्यांना त्याला खेळताना पाहायचे आहे त्यामुळे आम्ही त्याला मर्यादित वेळेसाठी शेवटच्या काही षटकांमध्ये मैदानात पाठवतो.”

हे ही वाचा<< रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स मॅच हायलाईट्स (CSK vs LSG Match Highlights)

दरम्यान, १९ एप्रिलला झालेल्या सामन्यात एलएसजीची वेगवान जोडगोळी यश ठाकूर आणि मोहसीन खान यांना तीन चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांसह धोनीच्या ताकदीची परिचिती आली होती. धोनीच्या प्रत्येक शॉटला टाळ्यांचा कडकडाट झाला, ज्यामुळे सीएसके १७६ ला ६ विकेट्स इतकी धावसंख्या उभारता आली. धोनीच्या कॅमिओसह, रवींद्र जडेजाच्या नाबाद ५७ धावांनी चेन्नईच्या धावांच्या आकड्यांमध्ये चांगली जोड दिली. दुसरीकडे, एलएसजीकडून या टार्गेटचा पाठलाग करताना कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी १३४ धावांची सलामी दिली, ज्यामुळे ८ गडी राखून विजय मिळवला.