इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या आधी, मुंबई इंडियन्सने नऊ सहकारी संघांचे शहरात विशेष होर्डिंगसह स्वागत केले आहे. #WelcomeDilKholKe असं लिहिलेले प्रत्येक संघासाठीचे वेगळे होर्डिंग्ज मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. यातून मुंबईकरांचा उत्साह आणि स्नेहाची भावना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे.
आयपीएल सुरू होण्याच्या अगोदरच आयपीएलचे सामने खेळण्यासाठी येणाऱ्या अन्य टीमचे मुंबई इंडियन्सकडून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आहे. याचं स्वागताची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू आहे. मुंबई इंडियन्सकडून सर्व संघाचे स्वागत करणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैद्राबाद, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाच्या स्वागताचे होर्डिंग्स मुंबई इंडियन्सने लावले आहेत.
मुंबई इंडियन्सच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातली पहिली लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर मुंबई इंडियन्स हा संघ आपला पहिला सामना २७ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स संघाविरोधात खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या सर्व संघांचं स्वागत करण्याच्या या अभिनव कल्पनेनं क्रिकेटप्रेमींचं मन जिंकलं आहे.