IPL 2025 CSK vs PBKS Highlights in Marathi: चेपॉकच्या मैदानावर सीएसकेला पुन्हा एकदा पराभवाचा फटका बसला आहे. पंजाब किंग्सने चेन्नईचा घरच्या मैदानावर ५ विकेट्सने पराभव केला. यंदाच्या मोसमात चेन्नईने घरच्या मैदानावर सलग पाच सामने गमावले आहेत. यासह चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतकं झळकावली. पण चेन्नईला पहिल्या डावात सर्वबाद करण्यात युझवेंद्र चहलच्या हॅटट्रिकचं मोठं योगदान आहे.
चेन्नई सुपर किंग्सला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता, पण पंजाब किंग्सने चेन्नईला पराभवाचा धक्का दिला. यासह चेन्नईचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नईचा संघ सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला.
चेन्नईने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात चांगली झाली. ४ षटकांत पंजाबने ३६ धावा केल्या आणि प्रियांश आर्य झेलबाद झाला. यानंतर प्रभसिमरन सिंग व श्रेयस अय्यरने मॅचविनिंग भागीदारी रचली. प्रभसिमरन सिंग ३६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावा करत बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर पुन्हा फॉर्मात आला आणि त्याने संघाच्या विजयाची जबाबदारी घेत एका टोकाला टिकून राहिला. त्याने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७२ धावांची शानदार खेळी केली.
श्रेयस आणि प्रभसिमरनसह शशांक सिंगने छोटी महत्त्वाची खेळी केली. शशांक १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २३ धावा करत बाद झाला. डेवाल्ड ब्रेविसने शशांकला बाद करण्यासाठी सीमारेषेजवळ एक कमालीचा झेल टिपला. यानंतर मार्काे यान्सने विजयी चौकार लगावत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह पंजाब किंग्सचा संघ १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईची पुन्हा एकदा फलंजाजीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. तर सीएसकेने प्लेऑफमध्ये ३ विकेट्स गमावले. यानंतर सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी उत्कृष्ट भागीदारी रचली. सॅम करनने ४७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८८ धावांची कमालीची खेळी केली. सीएसकेसाठी कोणत्याही खेळाडूची यंदाच्या मोसमातील ही सर्वात मोठी धावसंख्या होती.
डेवाल्ड ब्रेविसने २६ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांची खेळी केली . तर धोनी ११ धावा आणि शिवम दुबे ६ धावा करत बाद झाला. १९व्या षटकात युझवेंद्र चहलने अखेरच्या षटकात हॅटट्रिकसह ४ विकेट्स घेतले. यामुळे सामन्याचा रोख बदलला आणि सीएसकेचा संघ १९० धावांवर सर्वबाद झाला. पंजाबकडून युझवेंद्र चहलने ४ विकेट्स, यान्सन आणि अर्शदीपने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतले तर अझमतुल्ला आणि हरप्रीत ब्रार यांनी १-१ विकेट घेतली.