रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांनी आयपीएलचे जेतेपद पटकावले. आरसीबीच्या विजयानंतर जगभरातील चाहत्यांनी या विजयाचा एकच जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर तर पोस्ट आणि फोटोचा पूर आला आहे. एकापेक्षा एक जल्लोषाचे कमालीचे व्हीडिओ समोर येत आहेत. यादरम्यान आरसीबी संघाने बंगळुरमध्ये ओपन बस विजयी परेडचं आयोजन केलं होतं, पण आता ही परेड रद्द करण्यात आली आहे.

आरसीबीने पंजाब किंग्सचा अंतिम फेरीत ६ धावांनी पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांबरोबर संघाने विजयाचा आनंद साजरा केला. आयपीएल ट्रॉफी स्वीकारल्यानंतर खेळाडूंनी मैदानात विक्ट्री लॅप काढला. याचे व्हीडिओ फोटोही समोर आले.

आरसीबीने यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळुरूमधील चाहत्यांबरोबर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विजयी परेड असल्याची माहिती पोस्ट शेअर करत दिली. ही विजयी परेड आज म्हणजेच ४ जूनला ३.३० वाजता होणार होती. विधान सौधा येथून सुरूवात होणार असून ती चिन्नास्वामी स्टेडियमला संपणार होती. पण ही विजयी परेड आता रद्द करण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, आरसीबी संघाचा सत्कार बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत केला जाईल. खेळाडू कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विधान सौधा येथे भेट घेतील आणि तेथून थेट मैदानावर जातील. चिन्नास्वामीमध्ये प्रवेश केवळ पास असलेल्यांनाच असेल. स्टेडियमभोवती मर्यादित पार्किंग उपलब्धतेमुळे उपस्थितांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरसीबीची ही विजयी ओपन बस परेड रद्द कऱण्यामागचं मोठं कारण म्हणजे ट्रॅफिक जाम. संपूर्ण शहरात मोठं ट्रॅफिक जामची समस्या होण्यापासून वाचवण्यासाठी हा निर्णय बंगळुरू पोलिसांनी घेतला आहे आणि त्यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. बंगळुरू पोलिसांनी ट्विट करत म्हटलंय की, “आरसीबी संघाचा सत्कार सोहळा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ५ ते ६ या वेळेतअसेल. त्यामुळे विधानसौधा आणि चिन्नास्वामी येथील आजूबाजूच्या परिसरात चाहत्यांनी ३ ते ८ दरम्यान गर्दी करू नये. आरसीबीची विजयी ओपन बस परेड होणार नाही. पार्किंगची व्यवस्था कमी असल्याने चाहत्यांनी मेट्रो आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा.”