आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ४ गडी राखून पराभव केला. या पराभवासह आरसीबीचा इंडियन प्रीमियर लीग २०२४ मधील प्रवास संपला. अर्थात या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला पण संघाचा मोठा खेळाडू विराट कोहलीने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पूर्णपणे वर्चस्व गाजवले. विशेषतः त्याने ध्रुव जुरेलला ज्या पद्धतीने बाद केले ते पाहून सगळेच अवाक झाले. विराटने सीमारेषेजवळून रॉकेटसारखा थ्रो फेकला.

रियान परागने डावाच्या १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅमेरून ग्रीनविरुद्ध चांगला शॉट खेळला. रियान परागने हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. चेंडू वेगाने गेला, पण विराट कोहलीही त्याच वेगाने धावला. त्यानंतर कोहलीने गोलंदाजीच्या टोकावर थ्रो केला. यादरम्यान परागने दोन धावा चोरण्याचा प्रयत्न केला, त्याने पहिली धाव वेगाने धावली, परंतु दुसऱ्या धावेवर दोन्ही फलंदाज संथ झाले. इकडे कॅमेरून ग्रीनकडे चेंडू येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता विकेट्स विखुरल्या. ध्रुव जुरेल क्रीझवर पोहोचण्याआधीच तो बाद झाला होता.

विराटचा थ्रो येताना पाहून ध्रुव जुरेलने डायव्हिंग करून क्रीजच्या आत जाण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो काही इंच दूर राहिला. ध्रुव जुरेलचा हा धावबाद सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकला असता, पण दुर्दैवाने आरसीबीला विजय मिळवता आला नाही.

तिसऱ्या पंचांनी हा विकेट २-३ वेळा तपासून पाहिला. तिसऱ्या पंचाने ते तपासले तेव्हा जुरेलची बॅट क्रीजपासून थोडी दूर असल्याचे दिसून आले. जेव्हा ग्रीनने बेल्स विखुरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा हात स्टंपला लागला. बेल्स विखुरण्यापूर्वी जुरेल क्रीझवर पोहोचला नव्हता. तर बेल्स उडवल्यानंतर ग्रीनच्या हातून चेडू निसटला होता, त्यामुळे ग्रीनने जेव्हा त्याला बाद केले तेव्हा चेंडू त्याच्या हातात होता का हे पंचांनी तपासले आणि मग निर्णय दिला.

राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने ६ गडी गमावून ६ चेंडू बाकी असताना सामना जिंकला. त्यामुळे आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत कोलकाता संघाविरूद्ध विजेतेपदासाठी मैदानात उतरेल.