Rishi Sunak And Akshata Murty shares special moment with Virat and Anushka : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी (३ जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्जवर मात करत १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल चषक उंचावला. हा सामना पाहण्यासाठी आणि आरसीबी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या संघाचे हजारो चाहते मैदानात हजर होते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाल जनसागर (आरसीबीची जर्सी) उसळला होता. यामध्ये अनेक सेलिब्रेटी व राजकारणी देखील होते.

नरेंद्र मोदी स्टेडियममधील आरसीबीच्या एका चाहत्याने जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधलं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील आरसीबीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील हजर होत्या. या सामन्यानंतर सुनक दाम्पत्याने आरसीबीच्या विजयाचा जल्लोष केला. तसेच समाजमाध्यमांवर काही फोटो देखील शेअर केले आहेत.

ऋषी सुनक यांनी शेअर केला विराट-अनुष्काबरोबरचा फोटो

सुनक दाम्पत्याने आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. सुनक व कोहली दाम्पत्याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

“ई साला कप नामदू”

कोहली दाम्पत्याबरोबरचा फोटो शेअर करत अक्षता मूर्ती यांनी म्हटलं आहे की “अविस्मरणीय अशी रात्र, अविस्मरणीय सामना, बंगळुरूसाठी हा अविस्मरणीय असा क्षण आहे. अहमदाबादमध्ये येऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इतिहास घडवताना पाहणं हा खरोखर खूप खास क्षण होता. मैदानावरील खेळाडूंची ऊर्जा आणि बंगळुरूमधील लोकांचा जल्लोष खास होता. अनेक वर्षांपासून या विजयाची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी हा क्षण खास होता. या सर्वोत्तम संघाचा आणि मी ज्या शहरात वाढलेय त्या शहराचा मला अभिमान आहे. या वर्षी कप आपलाच आहे”.

पाठोपाठ ऋषी सुनक यांनी देखील या सामन्यादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांनी म्हटलं आहे, “काय भारी रात्र होती, यावर्षी कप आमचाच आहे”.