Dream11 IPL 2020 UAE MI vs KKR : मुंबई इंडियन्सने कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माच्या तडाखेबाज ८० धावांच्या खेळीमुळे मुंबईने १९५ धावांपर्यंत मजल मारली. पण आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाताच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. रोहित शर्माने या सामन्यात एक दमदार विक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने IPLकारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले. रोहितने ५४ चेंडूत ८० धावांची तुफानी खेळी केली. वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू असो, त्याने साऱ्यांचेच चेंडू सीमापार पोहोचवले. रोहितने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार लगावले. याचसोबत विशिष्ट एका संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वलस्थान पटकावले. रोहितने IPL कारकिर्दीत कोलकाता संघाविरूद्ध एकूण ८६५ धावा केल्या. एका संघाविरूद्ध ८५० धावांचा टप्पा पार करणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला. या यादीत डेव्हिड वॉर्नर (कोलकाताविरूद्ध ८२९ धावा) दुसऱ्या स्थानी तर विराट कोहली (दिल्लीविरूद्ध ८२५ धावा) तिसऱ्या स्थानी आहे.

रोहितने सामन्यात २०० IPL षटकारांचाही टप्पा गाठला. कुलदीप यादवला षटकार लगावत रोहित शर्माने IPL कारकिर्दीतील २०० षटकार पूर्ण केले. तो त्याचा डावातील सहावा षटकार होता. IPL कारकिर्दीत २०० षटकार लगावणारा रोहित चौथा खेळाडू ठरला. या यादीत सर्वाधिक ३२६ षटकारांसह ख्रिस गेल अव्वल, २१४ षटकारांसह डीव्हिलियर्स दुसरा तर २१२ षटकारांसह धोनी तिसरा आहे. त्यापाठोपाठ रोहितने २०० षटकारांचा टप्पा गाठला.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma becomes first batsman to score more than 850 runs against a same team mi vs kkr ipl 2020 vjb