Rohit Sharma broke Virat Kohli’s record : आयपीएल २०२४ च्या ४३व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २५७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ ९ बाद २४७ धावा करु शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा ८ धावा करुन बाद झाला. या खेळीच्या जोरावर रोहितने विराट कोहलीला मागे टाकत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक खास विक्रम केला आहे.

या सामन्यात ५ धावा करताच रोहित शर्मा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या अगोदर हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर होता. मात्र रोहितने आता विराटला मागे हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १०३० धावा केल्या आहेत. आता या संघाविरुद्ध रोहितच्या नावावर १०३४ धावांची नोंद झाली आहे.

हा खास विक्रम फक्त विराट-रोहितच्याच नावावर –

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोनच फलंदाज आहेत जे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १००० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरले आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाविरुद्ध रोहितने आयपीएलमध्ये ३४ सामन्यांत सहा अर्धशतके झळकावली आहेत. रोहित आणि कोहलीनंतर अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८५८ धावा केल्या आहेत. या यादीत रॉबिन उथप्पा ७४० धावांसह चौथ्या स्थानावर आहे. धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध त्याने ७०९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, झेल घेण्याच्या नादात तोडांवर आदळला चेंडू

आयपीएमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

रोहित शर्मा – १०३४ धावा
विराट कोहली – १०३० धावा
अजिंक्य रहाणे – ८५८ धावा
रॉबिन उथप्पा – ७४० धावा
एमएस धोनी – ७०९ धावा

हेही वाचा – DC vs MI : दिल्लीने मुंबईविरुद्ध तख्त राखले, जेक फ्रेझर मॅकगर्कची वादळी खेळी ठरली निर्णायक

रोहित शर्माकडून हा विक्रम थोडक्यात हुकला –

रोहित शर्मा दिल्लीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, पण तो एक मोठा विक्रम करण्यास मुकला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध किमान ५० षटकार मारणारा पहिला क्रिकेटर बनण्याचीही त्याला संधी होती. त्याच्या नावावर ४९ षटकार आहेत. या सामन्यात त्याने एक षटकार मारला असता, तर हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला असता.