Shane Watson Prediction On IPL 2025 Winner: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम ४ संघ ठरले आहेत. क्वालिफायर १ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अहमदाबादला अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहे. तर एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसनने कोणता संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ उंचावणार आयपीएलची ट्रॉफी

शेन वॉटसनच्या मते, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स संघ आयपीएल २०२५ स्पर्धेची ट्रॉफी उंचावू शकतो. तर विराट कोहली सामनावीर पुरस्कार पटकावू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. घराबाहेर खेळताना या संघाने ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील १४ सामन्यांमध्ये या संघाने ९ सामने जिंकले आहेत. १९ गुणांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला.

काय म्हणाला शेन वॉटसन?

यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंनी असं म्हटलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरू शकतो. शेन वॉटसन या संघाचा माजी खेळाडू आहे. त्याने आपल्या एक्स अकाऊंवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “ मी आधीपासून हाच विचार करतोय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ माझ्यासाठी विजेता संघ आहे. तर विराट कोहली सामनावीर असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ही योग्य वेळ आहे. जोश हेजलवूड मोक्याच्या क्षणी संघात परतला आहे.”

शेन वॉटसन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील माजी खेळाडू आहे. तो संघात असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०१६ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र अंतिम फेरीत शेन वॉटसनला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात ६१ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजी करताना त्याने ९ चेंडूत अवघ्या ११ धावा केल्या होत्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला होता.