Shubman Gill Kicks Abhishek Sharma Video IPL 2025: आयपीएल २०२५ मधील गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामना शुबमन गिलने पंचांशी घातलेल्या वादामुळे चर्चेचा मोठा विषय ठरला. या सामन्यात गुजरातने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या पराभवासह हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पण या सामन्यात गिलने पंचांशी वाद घातल्यानंतर अभिषेक शर्माला लाथ मारल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्स संघाने घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत चांगली धावसंख्या नोंदवली. गुजरातच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरूवात करत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. साई सुदर्शनने ४८ धावांची तर शुबमन गिलने ७६ धावांची आणि जोस बटलरने ६४ धावांची खेळी करत संघाला २२४ धावांचे लक्ष्य गाठण्यात मोठी मदत केली.

शुबमन गिलने या सामन्यात दोन वेळा पंचांशी हुज्जत घातली. गुजरातच्या संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि पंचामध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसले. पहिल्या डावात फलंदाजी करताना शुबमन गिल धावबाद झाल्यानंतर तिसऱ्या पंचानी दिलेल्या निर्णयावर गिलने नाराजी व्यक्त केली आणि डगआऊटजवळ असलेल्या पंचांशी वाद घातला. त्यानंतर दुसऱ्या डावात विकेटच्या निर्णयावरून मैदानातील पंचाशी वाद घातला.

अभिषेकच्या विकेटवरून गिलचा पंचांशी झाला वाद

१४व्या षटकात अभिषेक शर्माच्या विकेटवरून पंच आणि शुबमन गिलमध्ये वाद झाला. या षटकात गुजरातने अभिषेक शर्मा एलबीडब्ल्यू बाद झाल्याचं अपील केलं, पण रिव्ह्यूमध्ये तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद दिलं. यावरून गिलने पंचांशी वाद घातला. अंपायर्स कॉल असल्याने पंचांनी अभिषेकला नाबाद ठरवलं. यादरम्यान हैदराबादचे फिजिओ अभिषेकला ट्रीटमेंट देत होते. तितक्यात पंचांशी बोलल्यानंतर गिल अभिषेकजवळ आला आणि त्याला लाथ मारताना दिसला. गिल आणि अभिषेकमध्ये मस्ती आणि मस्करी चालू होती. पण गिलच्या चेहऱ्यावरील भाव हे रागात असल्याने चाहत्यांनी त्याच्या या वागण्यावर आक्षेप घेतला.

शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघेही चांगले मित्र आहेत. खरंतर दोघेही एकाच पंजाब राज्यातील आहेत. इतकेच नव्हे तर दोघांनीही भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगकडे क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. अभिषेक शर्मा आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात नव्हता. तेव्हा त्याने गिलकडून त्याची बॅट घेतली होती आणि पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात वादळी १४१ धावांची खेळी करत आयपीएलमध्ये विक्रम केला होता.