Sunrisers Hyderabad beat Punjab Kings by 4 wickets : सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खराब सुरुवात करूनही लक्ष्य गाठले. त्याचबरोबर या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाबच्या पराभवाने राजस्थानची वाढली डोकेदुखी –

तसेच राजस्थान रॉयल्सची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आता राजस्थान रॉयल्सला टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. पंजाब किंग्जच्या २१४ धावांना प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला बाद केले. मात्र, यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. राहुल त्रिपाठी १८ चेंडूत ३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर अभिषेक शर्मा २८ चेंडूत ६६ धावा करून शशांक सिंगच्या षटकात बाद झाला. तसेच नितीश रेड्डीने २५ चेंडूत ३७ धावांची चांगली खेळी केली. हेनरिक क्लासेनने २६ चेंडूत ४२ धावा केल्या. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादने १९.१ षटकांत ६ गडी राखून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेलने २-२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर शशांक सिंगने अभिषेक शर्माला बाद केले. तर हरप्रीत ब्रारने धोकादायक फलंदाजी करणाऱ्या हेन्रिक क्लासेनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

पंजाब किंग्जने उभारला २१४ धावांचा डोंगर –

तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून २१४ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने ४५ चेंडूत सर्वाधिक ७१ धावा केल्या. रायली रोसोने २४ चेंडूत ४९ धावांचे योगदान दिले. अथर्व तायडेने २७ चेंडूत ४६ धावांची चांगली खेळी केली. तर जितेश शर्मा १५ चेंडूत ३२ धावा करून नाबाद परतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunrisers hyderabad beat punjab kings by 4 wickets and reach top 2 point table abhishek sharmas half century in ipl 2024 vbm