Most sixes in IPL by age 21 : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ मधील आपल्या ७ व्या सामन्यात तिसरा विजय मिळवला. पंजाब किंग्ज विरुद्धच्या या सामन्यात मुंबई संघाकडून चमकदार फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यात सूर्यकुमार यादवने ७८ धावांची खेळी केली, तर डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेला युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मानेही दमदार फटकेबाजी केली. त्याने २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केवळ ३४ धावांची नाबाद खेळी करत संघाची धावसंख्या १९० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या या खेळीच्या जोरावर तिलकने आयपीएलमधील विशेष यादीतही आपले स्थान निर्माण केले.

ऋषभ पंतनंतर हा पराक्रम करणारा तिलक दुसरा खेळाडू ठरला –

तिलक वर्माने पंजाब किंग्जविरुद्धच्या ३८ धावांच्या नाबाद खेळीत 2 षटकारही मारले, ज्यासह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ५० षटकारही पूर्ण केले. वयाच्या २१व्या वर्षी आयपीएलमध्ये ५० षटकारांचा आकडा गाठणारा तिलक आता ऋषभ पंतनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे. पंतने वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत आयपीएलमध्ये ९४ षटकार ठोकले होते, तर तिलक वर्मा ५० षटकारांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर तिसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल आहे. वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत त्याने ४८ षटकार मारले होते.

वयाच्या २१व्या वर्षापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू –

ऋषभ पंत – ९४ षटकार
तिलक वर्मा – ५० षटकार
यशस्वी जैस्वाल – ४८ षटकार
पृथ्वी शॉ – ४५ षटकार
संजू सॅमसन – ३८ षटकार

हेही वाचा – IPL 2024: तिलक वर्माचा जबरदस्त शॉट स्पायडर कॅमवर जाऊनच आदळला, पण फटका बसला हर्षल पटेलला

या हंगामात आतापर्यंत ४१ च्या सरासरीने केल्या आहेत धावा –

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंतचा प्रवास चांगला नसला, तरी तिलक वर्माने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. सात डावात तिलकने ४१.६० च्या सरासरीने २०८ धावा केल्या आहेत, ज्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. या काळात तो दोनदा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तिलकच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्यांनी ३२ सामन्यांत ३९.५ च्या सरासरीने ९४८ धावा केल्या आहेत, ज्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.