आयपीएल २०२५ मध्ये भारताचे अनकॅप्ड युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित करत आहेत. पण यादरम्यान राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर ३५ चेंडूंत शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधले. ‘आयपीएल’मधील हे दुसरे सर्वांत जलद शतक ठरले. तसेच ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो सर्वांत युवा फलंदाज ठरला. या खेळीनंतर वैभवच्या वयाची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी व्हीडिओच्या माध्यामातून भारतीय क्रिकेट आणि वयचोरी याबाबत माहिती दिली आहे.
चाहत्यांप्रमाणेच सुनंदन लेले यांनी वैभव सूर्यवंशीच्या वयाबाबत मुद्दा उपस्थित केला. सुनंदन लेले म्हणाले, “सुंदर पिचाई यांनी चक्क एक ट्विट केलं की मी वैभव सूर्यवंशी जो राजस्थान रॉयल्सकडून खेळतो त्याची बॅटिंग बघायला मी सकाळी जागा झालो आणि पहिल्या बॉलला वैभव सूर्यवंशीने षटकार मारला आणि हरखून गेलो काय टॅलेंट आहे भारतामध्ये पण सॉरी मी असं म्हणतोय की वैभव सूर्यवंशीकडे बघितल्यानंतर तो १४ वर्षांचा खेळाडू वाटतो का? मला तरी वाटत नाही.”
वैभवच्या वयाच्या मुद्द्याला जोडून सुनंदन लेले वय चोरलेले खेळाडू या त्यांच्या युट्युब व्हीडिओमध्ये म्हणाले, “चला आयपीएलमध्ये ही वयोमर्यादा नाहीय, तुम्ही ९ वर्षांच्या पोरालासुद्धा खेळवू शकता आणि ९० वर्षांच्या म्हाताऱ्याला सुद्धा खेळवू शकता, ही वयोमर्यादा नाहीये पण १४ वर्षाचा सेन्सशन खेळाडू ही मला पटत नाहीये एवढाच माझा मुद्दा आहे.”
सुनंदन लेले पुढे म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे खेळाडू आत्ताच्या घडीला ज्यांनी पहिल्या मॅचला ३५-३६ रन्स केलेले पाहून मिडियाने त्यांचे गोडवे गायला सुरूवात केली. अरे जरा थांबा पुढच्या मॅचेसमध्ये तो कसा खेळतोय, सातत्या राखतोय का, काही तंत्र आहे का, हे पाहा.”
वैभवच्या फलंदाजीबाबत ज्येष्ठ पत्रकार म्हणाले, “मला ही गोष्ट सांगायला अजिबात आनंद होत नाहीये की, वैभव सूर्यवंशीने डोळे मिटून फक्त बॅट दांड पट्ट्यासारखा फिरवताना दिसला. समोर यशस्वी जैस्वाल बरोबर बघून फटके खेळत होता. चला टी-२० क्रिकेट आहे, वासू परांजपे पूर्वी म्हणायचे, टाक पाय पुढे आणि फिरव पंखा म्हणजे काय तर काही बॉल लागतील काही बॉल लागणार नाहीत. नशिबाचा हवाला ठेवून या गोष्टी करायला लागतात. पण यामध्ये जे खेळाडू फक्त नशिबाच्याच हवाल्यावर खेळताना दिसतात आणि यामध्ये त्यांनी कधी यश मिळालं की माध्यम त्याचा गोडवा गायला लागतात, ही गोष्ट मला पटत नाही.”
“कदाचित तुम्ही मला जुन्या काळातले विचार करणारे खेळाडू किंवा पत्रकार म्हणत असाल तर हा आरोप मला मान्य आहे. परंतु कुठला हिरा आहे कुठला दागड याचा थोडासा अंदाज येतो. आताच्या घडीला साई सुदर्शन अप्रतिम आणि सातत्याने बॅटिंग करतोय आणि उभारत्या खेळाडूंच्या यादीत आयुष म्हात्रेचं नाव आहे, वैभव सूर्यवंशीचं नाव आहे”, व्हीडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार लेले म्हणाले.
आयुष म्हात्रे, साई सुदर्शन यांच्या फलंदाजीबाबत लेले म्हणाले, “आयुष म्हात्रेने सुद्धा पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीप्रमाणे ३०-३५ धावा केल्या होत्या. परंतु फरक असा असा आहे की, आयुष म्हात्रेने रणजी मोसमात मुंबईकडून कडक बॅटिंग करून दाखवलेली आहे. साई सुदर्शन कडक बॅटिंग करतोय, शुबमन गिलसमोर तो जी बॅटिंग करतोय त्यात सातत्य हे उगाच नाहीये तर तंत्रशुद्ध बॅटिंग करून डोळे उघडे ठेवून बॉलकडे नजर ठेवून तो बॅटिंग करतोय. कुठला खेळा़डू लहान आहे म्हणून त्याचं कौतुक करायला नको त्याच्याकडे लक्ष देऊयात, एक सामन्यानंतर तो ‘लंबी रेस का घोडा’ म्हणायला नको. पण साई सुदर्शनची फलंदाजी पाहताना वाटतं हा पोरगा खरंच लक्षणीय फलंदाजी करतोय, हा मला खरा लंबी रेस का घोडा वाटतोय.”
© IE Online Media Services (P) Ltd