Vaibhav Suryavanshi in IPL 2025 RR vs GT Match : राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने २८ एप्रिल (सोमवार) रोजी राजस्थानच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर राजस्थानने अवघड सामना तर जिंकलाच, त्याचबरोबर आयपीएलमधील अनेक जुने विक्रम मोडित काढले. वैभवने अवघ्या ३५ चेंडूंत शतक ठोकल्याने तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक फटकावणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. वैभवने भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युसूफ पठाणचा (३७ चेंडूत शतक) विक्रम मोडला आहे.
वैभवची खेळी इतकी जबरदस्त होती की त्याला चिअर करण्यासाठी (प्रोत्साहन देण्यासाठी) राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जो पायाच्या दुखापतीमुळे गेल्या काही दिवसांपासून व्हीलचेअरवर आहे, तो देखील उठून उभा राहिला होता, टाळ्या वाजवत होता. गुजरातविरुद्धची वैभवची फलंदाजी पाहून अनेकांना त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. अशातच राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी वैभवच्या खेळाचे वेगवेगळे पैलू शेअर केले आहेत. हा खेळाडू इतरांपेक्षा वेगळा का आहे? इतर फलंदाजांपेक्षा त्याच्याकडे काय खास आहे याबाबत राठोड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
असा खेळ करणं अवघड : विक्रम राठोड
राठोड म्हणाले, “वैभव खूप खास खेळाडू आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही त्याला नेट्समध्ये सराव करताना पाहत आहोत. त्याचा खेळ काल सर्वांनी पाहिला असला तरी आम्ही मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं पाहत आहोत. नेट्समध्ये त्याचे फटके पाहत आहोत. परंतु, इतक्या मोठ्या स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत, समोर मोठ्या धावसंख्येचं आव्हान असताना दबावात असा खेळ करणं अद्वितीय आहे. समोरच्या संघाची गोलंदाजी तगडी असताना त्यांच्यावर आक्रमण करणं खरोखरंच खास आहे. याचं सगळं श्रेय वैभवच्या मेहनतीला जातं.”
राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले, “वैभव सूर्यवंशी केवळ १४ वर्षांचा असला तरी त्याचे फटके पाहताना प्रश्न पडतो की याने इतकी ताकद कुठून आणली? त्याची शक्ती पाहून आपण थक्क होतो. त्याच्याकडे खास प्रतिभा आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याचा खेळ उत्तम आहे. तसेच तो १४ वर्षांचा असला तरी तंदूरुस्त आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने त्याची शक्ती दाखवून दिली. चार महिन्यांपूर्वी त्याला आम्ही नेट्समध्ये खेळताना पाहिलं होतं. तेव्हापासून आम्हाला कल्पना होती की हा खास खेळाडू आहे. हा एक असाधारण हिरा आम्हाला गवसला आहे. त्याला आणखी पुढे नेण्याची जबाबदारी फ्रेंचायझी व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची आहे.”
वैभव आणि राजस्थानचा संघ आता आपल्याला १ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.