Virat Kohli’s argument with umpire : रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव करून प्लेऑफ्सच्या आशा जिवंत ठेवल्या. या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली अंपायरशी भिडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अंपायरशी जोरदार वाद घालताना दिसत आहे. याआधीही विराट कोहलीला याच हंगामात अंपायरशी वाद घातल्याबद्दल मॅच फीच्या ५० टक्के दंड भरावा लागला आहे.

विराट कोहली अंपायरशी भिडला –

वास्तविक, ही घटना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीदरम्यान दुसऱ्या षटकात घडली. या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला. दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अभिषेक पोरेल स्ट्राइकवर उपस्थित होता. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर इन-स्विंगिंग यॉर्कर टाकला, ज्यावर अभिषेक पोरेलने त्याची बॅट खाली केली. आरसीबीच्या क्रिकेटपटूंना खात्री होती की चेंडू स्टंपसमोर अभिषेक पोरेलच्या पॅडला लागला आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. यावर मैदानावरील अंपायरनी नॉट आऊट दिल्यानंतर आरसीबीने रिव्ह्यू घेतला.

या प्रकरणावरून झाला गदारोळ –

रिव्ह्यू पाहिल्यानंतर थर्ड अंपायरनी चेंडू अभिषेक पोरेलच्या बॅटला लागल्याचे सांगितले. अशा स्थितीत अभिषेक पोरेलला नॉट आऊट घोषित करण्यात आले. त्यामुळे थर्ड अंपायरनी हा निर्णय दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने दिला. यानंतर विराट कोहली आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस या निर्णयावर खूश नव्हते. त्यामुळे विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी या प्रकरणावर अंपायरशी दीर्घ चर्चा केली. या दरम्यान विराट कोहली मैदानावरील अंपायरशी वाद घालतानाही दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – RCB vs DC : रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने नोंदवला सलग पाचवा विजय, ४७ धावांनी उडवला दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा

आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सवर केली मात –

सामन्यात रजत पाटीदारच्या अर्धशतकानंतर, यश दयाळच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव करत सलग पाचवा विजय नोंदवला. आरसीबीच्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ कर्णधार अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर (३९ चेंडूंत ५७ धावा, ५ चौकार, ३ षटकार) आणि त्याच्या पाचव्या विकेटच्या भागीदारीच्या जोरावर १९.१ षटकांक १४० धावांपर्यंतच मजल मारु शकला. शाई होपने (२९) कर्णधारासह पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पण दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.