Virat Kohli Creates History in IPL: आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्स वि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने या सामन्यात २९ धावा करताच मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी कोणत्याच खेळाडूला करता आलेली नाही.

आयपीएलमध्ये तब्बल ८ हजार धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने २५२व्या आयपीएल सामन्याच्या २४४व्या डावात ८ हजार धावा पूर्ण केल्या. लीगमध्ये ४०००, ६००० आणि ७००० धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा ॲडम गिलख्रिस्टने केल्या होत्या. तर सर्वात जलद २००० धावा, ३००० धावा आणि ५००० धावा सुरेश रैनाने केल्या होत्या. आयपीएल २०२४ मध्येही विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपताना दिसली आहे. १७व्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा विराट कोहलीचं आहे त्याच्या आसपासही इतर कोणताच फलंदाज नाही.

हेही वाचा – RCBचे सराव सत्र रद्द होण्यामागचे खरे कारण आले समोर. विराट कोहलीच्या सुरक्षिततेला….

विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठऱला आहे. या यादीत शिखर धवन दुसऱ्या, रोहित शर्मा तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर चौथ्या आणि सुरेश रैना पाचव्या स्थानावर आहे. या यादीत महेंद्रसिंग धोनी (५२४३ धावा) सहाव्या, एबी डिव्हिलियर्स (५१६२ धावा) सातव्या, ख्रिस गेल (४९६५ धावा) आठव्या, रॉबिन उथप्पा (४९५२ धावा) नवव्या आणि दिनेश कार्तिक (४८३१ धावा) दहाव्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली: ८०००* धावा
शिखर धवन : ६७६९ धावा
रोहित शर्मा : ६६२८ धावा
डेव्हिड वॉर्नर : ६५६५ धावा
सुरेश रैना : ५५२८ धावा

एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण तो मोठी खेळी करू शकला नाही . विराट २४ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा करत चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. १० षटकांनंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची धावसंख्या २ बाद ७६ धावा आहे.