Virat Kohli Strike Rate: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि मुंबई यांच्यातील सामन्यादरम्यान मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर मांजरेकर यांना फटकारले आहे.
विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रेड्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये विकासने लिहिले की, “संजय मांजरेकर यांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा स्ट्राइक रेट ६४.३१ आहे. २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटबद्दल बोलणे खूप सोपे आहे.”
काही दिवसांपूर्वी मांजरेकर म्हणाले होते की, “कोहली आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शिखरावर नाही. त्याचा बेस्ट विरुद्ध बेस्ट मध्ये समावेश होऊ शकत नाही.” याशिवाय, संजय मांजरेकर यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये कोहलीला अव्वल १० फलंदाजांच्या यादीतून बाहेर ठेवले होते. दरम्यान, विराट कोहलीचा यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल ५ फलंदाजांमध्ये समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी, मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी मांजरेकर यांनी कोहलीवर प्रश्न उपस्थित केले होते. जेव्हा मांजरेकर यांना कोहली आणि बुमराह यांच्यातील सर्वोत्तम खेळाडू निवडण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी दोघांमध्ये स्पर्धा आहे हे मान्य करण्यास नकार दिला.
मांजरेकर म्हणाले की, “विराट आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही.” त्याच वेळी, जेव्हा मांजरेकर यांनी कोहलीवर टीका केली तेव्हा विराटच्या चाहत्यांना ते आवडले नाही. यानंतर चाहत्यांनी मांजरेकर यांच्यावरो मोठ्या प्रमाणात टीका केली होती.
आयपीएल २०२५ मधील कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या हंगामात आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ४४३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ६३.२८ आहे तर स्ट्राइक रेट १३८.८७ आहे.
दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, कोहलीने कठीण खेळपट्टीवर ४७ चेंडूत ५१ धावा केल्या होत्या, जे या हंगामातील त्याचे सहावे अर्धशतक होते. कोहलीच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने दिल्लीचा ६ गडी राखून पराभव केला होता.
आयपीएलच्या इतिहासात, विराट कोहली हा एका हंगामात सर्वाधिक वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने आयपीएलमध्ये ११ वेळा हा पराक्रम केला आहे.