Virat Kohli Dance On Chiku Chants: विराट कोहली हा मैदानावर खेळताना जितका एकाग्र, उर्जावान, आणि जिंकण्याच्या इच्छेने पेटून उठलेला दिसतो तितकाच खेळकर सुद्धा आहे याचा पुरावा अनेक व्हायरल व्हिडीओजमध्ये दिसून येतो. काही वेळा समोरच्या गोलंदाजांना विराटच्या या आत्मविश्वासाने धडकी भरते असंही म्हणायला हरकत नाही. आता सुद्धा कोहलीचा एक व्हिडीओ त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतोय.

आयपीएल २०२४ मध्ये बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढतीच्या वेळी कोहलीचा हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. कुण्या चाहत्यानेच हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असावा आणि मग काहीच तासांमध्ये तो प्रचंड व्हायरल होऊ लागला.

आपण व्हिडीओमध्ये बघू शकता की, विराट सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना स्टँडमधून ‘चिकू चिकू’ म्हणत चाहते त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. तुम्हाला माहीतच असेल, चिकू हे टोपणनाव विराटला त्याच्या रणजी ट्रॉफीच्या दिवसांमध्ये प्रशिक्षकाने दिले होते . अनेकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना अनेक सहखेळाडू विराटला याच नावाने हाक मारायचे. प्रेक्षकांनी सुद्धा जेव्हा त्याला चिकू म्हणून हाक मारायला सुरुवात केली तेव्हा काही वेळा यावरून विराट चिडला सुद्धा होता पण आता तो हे सगळं मस्करीत घेत उलट चाहत्यांसह मजा करताना दिसत आहे. अगदी या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा विराट ‘चिकू चिकू’ च्या घोषणांना ठुमके मारून नाचून उत्तर देतोय, हे बघून चाहते तर खुश होतातच पण विराटला सुद्धा हसू आवरत नाही.

दरम्यान, विराट कोहलीच्या या ठुमक्यांनी चाहत्यांना काही क्षण खुश केलं असलं तरी आरसीएबीच्या या ही आयपीएल मधील कामगिरी निराशाजनकच आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत अवघ्या एका विजयाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू शेवटच्या स्थानी आहे. यंदा महिलांच्या आयपीएल सामन्यांमध्ये आरसीबीने बाजी मारली होती, तीच जादू पुरुषांच्या आयपीएलमध्येही दिसावी यासाठी चाहते प्रार्थना करत होते पण सध्या तरी या प्रार्थना फळाला येताना दिसत नाहीत.