Virat Kohli Record, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा सुपरहिट शो सुरू आहे. या स्पर्धेत फलंदाजी करताना विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातही विराटची बॅट चांगलीच तळपली. या डावात फलंदाजी करताना त्याने ७० धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमधील मोठ्या रेकॉर्डमध्ये बाबर आझमला मागे सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धावांचा पाठलाग करताना खेळी कशी सजवायची, हे विराट कोहलीला चांगलच माहित आहे. त्यामुळेच विराट कोहलीला चेजमास्टर म्हटलं जातं. मात्र, पहिल्या डावात फलंदाजी करतानाही त्याने अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला. विराटने ३३ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे विराटने पहिल्या डावात फलंदाजी करताना विराटने झळकावलेले ६२ वे अर्धशतक आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने बाबर आझमला मागे सोडलं आहे. बाबर आझमच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करताना ६१ अर्धशतकं झळकावण्याची नोंद आहे. तर वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गेलने ५७ अर्धशतकं झळकावली आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे फलंदाज

विराट कोहली- ६२ वेळेस
बाबर आझम – ६१ वेळेस
ख्रिस गेल – ५७ वेळेस
डेव्हिड वॉर्नर – ५५ वेळेस
जोस बटलर – ५२ वेळेस
फाफ डू प्लेसिस- ५२ वेळेस

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उभारला २०५ धावांचा डोंगर

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण हे मैदान छोटं आहे आणि या मैदानावर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि फिल सॉल्टने गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

सॉल्ट २६ धावा करत माघारी परतला. तर विराट कोहलीने ७० धावा केल्या. हे विराट कोहलीचे या हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले आहे. विराटला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो झेलबाद होऊन माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या देवदत्त पडिक्कलने ५० धावांची खेळी केली. शेवटी टीम डेव्हिडने काही आकर्षक फटके मारले. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकअखेर ५ गडी बाद २०५ धावांचा डोंगर उभारला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli score most 50 plus scores batting first in t20 cricket rcb vs rr ipl 2025 amd