Virat Kohli Special Instagram Post For Anushka Sharma: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.या स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करणारा विराट या संघासोबत एकनिष्ठ राहिले. अनेक खेळाडू आले आणि गेले. हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिला, पण विराटने या संघाची साथ सोडली नाही. अखेर पंजाब किंग्ज संघाला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.

या विजयात विराट कोहलीचा मोलाचा वाटा राहिला. जेव्हा जेव्हा संघाला गरज होती. तेव्हा विराट खंबीरपणे उभा राहिला. विराटला समर्थन करण्यासाठी अनुष्का शर्मा देखील नेहमी पाठीशी उभी राहिली. आता ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटने अनुष्का शर्मासाठी हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला भावूक करणारे कॅप्शन देत त्याने लिहिले,” मी गेल्या १८ वर्षांपासून आणि अनुष्का गेल्या ११ वर्षांपासून हे स्वप्न पाहत आहे. २०१४ पासून आम्ही अनेक कठीण समस्यांचा एकत्र सामना केला. चिन्नास्वामीवर मिळवलेल्या प्रत्येक थरारक विजयाचा, सामना पाहण्यासाठी आलेल्या समर्थकांच्या उत्तासाहाचा एकत्र आनंद घेतला. अनुष्का बंगळुरूची असल्यामुळे हा क्षण तिच्यासाठी खूप खास आहे. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत आम्ही एकत्र आहोत.” विराटने शेअर केलेल्या या पोस्टवर अवघ्या काही तासात ३ मिलियन्सहून अधिक लाईक्स आहेत.

ज्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यावेळी विराटच्या डोळ्यात अश्रू आले होते. शेवटच्या षटकातील सुरूवातीचे दोन चेंडू पडताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा विजय निश्चित झाला होता. त्यावेळी विराटला गेल्या १८ वर्षांत काय काय घडलं, हे सर्व आठवू लागलं होतं. हे त्याने सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सामना जिंकताच अनुष्का शर्मा मैदानात आली. विराटने अनुष्का शर्माला मिठी मारल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. विराटला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आयपीएल ट्रॉफी उंचावताना पाहणं हे अनुष्का शर्माचंही स्वप्न होतं. अखेर हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा दमदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं,तर या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने २६ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर १९० धावा करता आल्या. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी १९१ धावा करायच्या होत्या.या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून शशांक सिंगने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. मात्र, पंजाबचा संघ विजयापासून ६ धावा दूर राहिला.