Virat Kohli told the reason for loyalty with RCB: विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले नसेल, पण या संघावरील त्याची निष्ठा सर्वांनाच आवडली आहे. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सत्रापासून कोहली याच संघाकडून खेळत आहे. या लीगमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक सामने खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. प्रत्येक फ्रँचायझी कोहलीला त्यांच्या संघात सामील करुन घेण्यास तयार आहे, पण माजी भारतीय कर्णधार यासाठी तयार नाही.

कोहलीला टॉप ऑर्डरमध्ये खेळायचे होते –

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराट कोहलीने आरसीबीसोबतच्या त्याच्या खास नात्यामागचे कारण सांगितले. जिओसिनेमावर रॉबिन उथप्पाला मुलाखत देताना तो म्हणाला, “मी लीगच्या सुरुवातीला दुसऱ्या एका फ्रँचायझीशी बोललो होतो, की मला त्यांच्यासाठी टॉप ऑर्डरमध्ये खेळायचे आहे. मात्र त्यांनी माझे ऐकले नाही. तेव्हा मी पाच किंवा सहाव्या क्रमांकावर खेळायचो.”

खालील लिंकवर पाहू शकता मुलाखत –

https://www.jiocinema.com/sports/virat-from-the-heart/3726705

कोहलीला २०११ मध्ये मिळाली होती ऑफर –

कोहलीने पुढे सांगितले की, २०११ मध्ये ती फ्रँचायझी कोहलीकडे परत आली. तोपर्यंत कोहलीने टीम इंडियात आपले स्थान पक्के केले होते आणि तो चांगला खेळत होता. यावेळी कोहलीने त्यांना नकार दिला. कोहली म्हणाला, “मी आरसीबीला महत्त्व देतो. कारण लीगच्या पहिल्या तीन हंगामात त्यांनी मला पाठिंबा दिला. जेव्हा मी त्यांना सांगितले की मला तिसऱ्या क्रमांकावर खेळायचे आहे, तेव्हा त्यांनीही त्या निर्णयाचे समर्थन केले.”

हेही वाचा – VIDEO: हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने मुंबई दिला महत्त्वाचा सल्ला; म्हणाला, “अहंकार नेहमी…”

…म्हणून कोहलीने आरसीबीची साथ सोडली नाही –

आरसीबीचा माजी कर्णधार असलेला कोहली म्हणाला, “मी फ्रँचायझीचे नाव घेणार नाही, पण जेव्हा मला त्यांच्यात सामील व्हायचे होते, तेव्हा त्यांनी माझे ऐकले नाही. त्यानंतर मग जेव्हा मी टीम इंडियासाठी धावा करू लागलो, तेव्हा ते म्हणाले की मी लिलावात यावे. त्यावेळी मी साफ नकार दिला. ज्या संघाने माझ्यावर विश्वास दाखवला त्या संघासोबत मला राहायचे होते.” कोहलीने ९ हंगामात आरसीबीचे कर्णधारपद भूषवले आणि धावाही केल्या.