Who is Ayush Mhatre CSK Sign 17 Year Old Mumbai Boy for IPL 2025: चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबईचा मराठमोळा खेळाडू आयुष म्हात्रेला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सविरद्धच्या सामन्यात १७ वर्षीय आयुष म्हात्रे आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करत आहे. राहुल त्रिपाठीच्या जागी त्याला संघात संधी मिळाल्याची माहिती नाणेफेकीनंतर धोनीने दिली आहे. वानखेडेवर होत असलेल्या मुंबई इंडियन्सने या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर सीएसकेला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

आयपीएल २०२५ च्या चालू हंगामातच चेन्नई सुपर किंग्सला कर्णधाराच्या रूपात मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. गायकवाडच्या जागी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले आहे. दरम्यान सीएसकेने, १७ वर्षीय स्फोटक सलामीवीर फलंदाजाला चेन्नई सुपर किंग्स संघात ऋतुराज गायकवाडच्या जागी सामील केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या १७ वर्षीय खेळाडूला संघात सामील केलं आहे. त्याने ऋतुराज स्पर्धेबाहेर झाल्यानंतर ट्रायल दिले होते, त्यानंतर त्याची संघात निवड करण्यात आली आहे. चेन्नईच्या लखनौविरूद्ध सामन्यानंतर संघाने आयुष म्हात्रेला संघात सामील केल्याची घोषणा केली.

आयुष म्हात्रेला ट्रायल्ससाठी बोलावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने त्याची निवड केली. गुरुवारी, १० एप्रिल रोजी ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर झाला आणि दुसऱ्या दिवशी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या घरच्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत एमएस धोनीने संघाचे नेतृत्व केले. शनिवारी ऋतुराजच्या जागी आयुषला संघात आणण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्जने घेतला.

कोण आहे आयुष म्हात्रे?

आयुष म्हात्रे मूळचा मुंबईचा आहे. त्याचे सध्या वय १७ वर्षे २७२ दिवस आहे. म्हात्रे उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजीही करतो. तो मुंबई क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

आयुष म्हात्रेने आतापर्यंत त्याने नऊ प्रथम श्रेणी आणि सात लिस्ट ए सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. आयुषने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या १६ डावांमध्ये ३१.५० च्या सरासरीने ५०४ धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए क्रिकेटच्या सात डावांमध्ये ६५.४२ च्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत. आयुष केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही माहिर आहेत. त्याला आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विकेट मिळवता आलेली नाही. पण चार लिस्ट ए डावांमध्ये त्याने ११.२८ च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या आहेत.

आयुष रोहित शर्माला आपला आदर्श मानतो आणि मुंबईचा हा युवा फलंदाज त्याचा आदर्श असलेल्या रोहित शर्माच्या अखत्यारित असलेले अनेक स्ट्रोक खेळण्यात माहिर आहे.