Yashasvi Jaiswal First Century In IPL : आयपीएल २०२३ चा ४२ वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. राजस्थानचे इतर फलंदाज धावांसाठी संघर्ष करत असतानाच यशस्वी जैस्वालने वादळी खेळी करून आयपीएल करिअरमधील पहिलं शतक ठोकलं आहे. मागील काही सामन्यात जैस्वालने अप्रतिम फलंदाजी करून जलवा दाखवला होता. पण आजच्या सामन्यात शतक ठोकून कमाल केली. जैस्वालने ६२ चेंडूत ८ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीनं १२४ धावांची शतकी खेळी साकारली.

राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एरव्ही धडाकेबाज फलंदाजी करणारा बटलर आजच्या सामन्यात धावांसाठी संघर्ष करताना दिसला. पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर बटलर १८ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर यशस्वी जैस्वालने वानखेडे मैदानात धावांचा पाऊस पाडला. मैदानात चारही दिशेला मोठे फटके मारून जैस्वालन मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

दुसऱ्या एंडला राजस्थानचे एकापाठोपाठ एक विकेट जात असताना दुसरीकडे मात्र जैस्वाल धावांची गती वाढवत होता. ६२ चेंडूत १२४ धावांवर खेळत असताना शेवटच्या षटकात अर्शद खानने जैस्वालला झेलबाद केलं. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ७ विकेट्स गमावत २१२ धावांपर्यंत मजल मारली. मुंबई इंडियन्सला विजयासाठी २१३ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.