नागपूर : अभिमन्यू ईश्वरन (५२) आणि कर्णधार रजत पाटीदार (नाबाद ४२) वगळता अन्य फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे इराणी चषक क्रिकेट लढतीत शेष भारताचा संघ अडचणीत सापडला आहे. विदर्भाच्या पहिल्या डावातील ३४२ धावांच्या प्रत्युत्तरात शेष भारताची दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १४२ अशी स्थिती होती. ते २०० धावांनी पिछाडीवर आहेत.
जामठा येथे सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी ५ बाद २८० धावांवरून पुढे खेळताना विदर्भाचा पहिला डाव ३४२ धावांवर आटोपला. सलामीवीर अथर्व तायडेने २८३ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने १४३ धावांची खेळी केली. मात्र, त्याला तळाच्या फलंदाजांची फारशी साथ लाभली नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळात विदर्भाने पाच गडी ६२ धावांतच गमावले.
प्रत्युत्तरात ईश्वरन (११२ चेंडूंत ५२) आणि आर्यन जुयाल (६३ चेंडूंत २३) यांनी शेष भारताच्या डावाची सावध सुरुवात केली. या दोघांनी २० षटकांत ५२ धावांची सलामी दिली. दर्शन नळकांडेने अप्रतिम इनस्विंग चेंडू टाकत जुयालला पायचीत केले. पाठोपाठ डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका मारून यश धूल (११) बाद झाला.
कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या ईश्वरनने खेळपट्टीवर टिकाव धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्याला डावखुरा फिरकीपटू पार्थ रेखाडेने पायचीत केले. ऋतुराज गायकवाड (९) आणि इशान किशन (१) या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या फलंदाजांनी निराशा केली. पाटीदारने मात्र एक बाजू लावून धरताना ९० चेंडूंत नाबाद ४२ धावांची खेळी केली आहे. दिवसअखेर त्याच्यासह मानव सुथार (नाबाद १) खेळपट्टीवर होता. आता शेष भारताला विदर्भाच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचायचे झाल्यास या दोघांना मोठी भागीदारी करावी लागेल.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ (पहिला डाव) : १०१.४ षटकांत सर्वबाद ३४२ (अथर्व तायडे १४३, यश राठोड ९१, दर्शन नळकांडे २०; आकाश दीप ३/५१, मानव सुथार ३/७४, सारांश जैन २/९४) शेष भारत (पहिला डाव) : ५३ षटकांत ५ बाद १४२ (अभिमन्यू ईश्वरन ५२, रजत पाटीदार नाबाद ४२, आर्यन जुयाल २३; पार्थ रेखाडे २/२४, दर्शन नळकांडे १/२६)