युवराज सिंगला फलंदाजीसाठी आणखी वरच्या क्रमांकावर बढती देणे अवघड असल्याचे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. युवराजला फलंदाजीची कमी संधी मिळत असल्याचे धोनीने यावेळी कबूल केले. मात्र, सुरूवातीच्या चार फलंदाजांची कामगिरी उजवी असल्यामुळे युवराजला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे काहीसे अवघड असल्याचे धोनीने म्हटले.
शुक्रवारी रांचीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करताना धोनीने युवराजच्याजागी हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी पाठवले होते. त्यामुळे युवराजला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. गेल्या काही सामन्यांमध्येही युवराजला पहिल्या पाच खेळाडूंनंतर फलंदाजीची संधी देण्यात येत आहे. युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. तरीही त्याला फलंदाजीची संधी फार कमी मिळत आहे.
यासंदर्भात धोनी म्हणाला की, युवराजला फलंदाजीची संधी कमी मिळतेय हे दिसतेय. पण, पहिले चार फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करत असताना त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविणे अवघड आहे. सलामीच्या दोन फलंदाजांमध्ये बदल करु शकत नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे युवराजला पाचव्या क्रमांकावर पाठविण्याशिवाय पर्यायच नाही. मात्र, तरीही युवराजला अधिकाधिक फलंदाजीची संधी देण्याकडे माझा कल असतो. सामना जिंकणे हेच आमचे मुख्य ध्येय असून, विश्वकरंडकात सर्वांना संधी मिळेल, असे धोनीने यावेळी म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
युवराजला फलंदाजीत बढती देणे अवघड-धोनी
रांचीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करताना धोनीने युवराजच्याजागी हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी पाठवले होते
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-02-2016 at 14:39 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is a bit difficult to promote yuvraj singh above five says ms dhoni