पीटीआय, मुंबई
खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारात अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांची राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी आपापसात खरेदी विक्री केली. त्यामुळे नव्या हंगामात जडेजा राजस्थान, तर संजू चेन्नईकडून खेळेल. ‘आयपीएल’कडून दिलेल्या माहितीनुसार जडेजाचे मूल्य १८ कोटी रुपयांवरून १४ कोटी रुपये करण्यात आले आहे, तर सॅमसन (१८ कोटी रुपये) त्याच्या विद्यमान मूल्यातच चेन्नईशी करारबद्ध होईल.
सॅमसन ‘आयपीएल’मधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असून, त्याने १७७ लीग सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज हा त्याचा तिसरा संघ आहे. त्याने २०१६ आणि २०१७ ही दोन वर्षे वगळता २०१३ मध्ये पदार्पण केल्यापासून कायम राजस्थान रॉयल्सचेच प्रतिनिधित्व केले आहे. सॅमसन प्रमाणे चेन्नईने इंग्लंडच्या सॅम करनचे विद्यमान २.२४ कोटी रुपयांवर राजस्थान रॉयल्सकडे हस्तांतर केले आहे.
अंतर्गत व्यवहारानुसार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता सध्याच्या १० कोटी मूल्यांवर सनरायजर्स हैदराबादकडून लखनऊ सुपर जायंट्सकडे हस्तांतरित झाला आहे. शमीने गुजरात टायटन्सकडून खेळताना २०२३ मध्ये २० गडी बाद केले होते. मुंबई इंडियन्सने सध्याच्या ३० लाख रुपयांत अर्जुन तेंडुलकरला लखनऊकडे हस्तांतरित केले आहे. नितीश राणा ४.२ कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर आता राजस्थानऐवजी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळेल. हा व्यवहार करताना त्यांनी डोनावन फरेराला (एक कोटी) राजस्थानकडे हस्तांतरित केले.गुजरात टायटन्सने करीम जनात, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, दसुन शनाका, महिपाल लोमरोर यांना संघमुक्त करताना शेरफेन रुदरफोर्डची मुंबई इंडियन्सशी देवाणघेवाण केली. चेन्नईने डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, आर.अश्विन, दीपक हुडा, सॅम करन, मथीश पथिराना या प्रमुख खेळाडूंना मुक्त केले आहे.
सनरायझर्स हैदराबादने शमी, ॲडम झॅम्पा आणि राहुल चहरसह आठ खेळाडूंना मुक्त केले आहे. पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, कुलदीप सेन आणि प्रवीण दुबे यांना मुक्त केले. मुंबई इंडियन्सने नऊ खेळाडूंना मुक्त केले असून, यात रीस टोपली, कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुथूर या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. लखनऊ संघाने आकाशदीप, रवी बिश्नोई आणि डेव्हिड मिलर या प्रमुख खेळाडूंना मुक्त केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सहा खेळाडूंना करारमुक्त केले असून , यामध्ये फाफ डुप्लेसिस, जॅक फ्रेझर मॅगर्क या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. मोहित शर्मा, सेदिकुल्ला अटल, मनवंत कुमार आणि दर्शन नलकांडे यांनाही त्यांनी मुक्त केले आहे. गेल्या हंगामात पाचव्या स्थानावर राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल, कुलदीप यादव, केएल राहुल, मिचेल स्टार्क, ट्रिस्टन स्टब्स यांना कायम ठेवले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतर्गत व्यवहारानंतर सर्वाधिक रक्कम शिल्लक ठेवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझींमध्ये पुढील महिन्यात अबू धाबी येथे होणाऱ्या लिलावात बोली लावण्यात तीव्र चढाओढ लागण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक फ्रँचायझींनी आपल्या प्रमुख खेळाडूंना संघमुक्त केले असून, हे सर्व खेळाडू आता लिलावात सहभागी होतील.
पुढील महिन्यात १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या लिलावात १० फ्रँचायझी आपला संघ भक्कम करण्यासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतील. यामध्ये वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी) आणि आंद्रे रसेल (१२ कोटी) यांना करारमुक्त करून कोलकाता नाइट रायडर्स ६३.४ कोटी रुपयांसह लिलावात सहभागी होईल. चेन्नई सुपर किंग्जने अंतर्गत व्यवहारात संजू सॅमसनला खरेदी करूनदेखील ४० कोटी रुपये शिल्लक ठेवले आहेत. कोलकाता त्यांच्या संघाची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करेल, तर चेन्नईचा कल गोलंदाजीची बाजू भक्कम करण्याकडे राहील. यासाठी चेन्नई मथिश पथिरानाला परत खरेदी करण्याचा किंवा ॲशेस मालिकेनंतरच्या उपलब्धतेनुसार बेन स्टोक्सला लक्ष्य करू शकते.
कोलकाताने क्विंटन डीकॉक, मोईन अली आणि आनरिख नॉर्किए यांनाही करारमुक्त केले आहे. मात्र, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंह, हर्षित राणा आणि अंगक्रीश रघुवंशी हा एक मुख्य गट कायम ठेवला आहे. कोलकाताकडे आता तेरा जागा शिल्लक असून, यात सहा परदेशी जागा आहेत.
कोणाकडे किती रक्कम शिल्लक
– चेन्नई सुपर किंग्ज (४३.४० कोटी रुपये)
– मुंबई इंडियन्स (२.७५ कोटी रुपये)
– रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (१६.४० कोटी रुपये)
– कोलकाता नाइट रायडर्स (६४.३० कोटी रुपये)
– सनरायजर्स हैदराबाद (२५.५० कोटी रुपये)
– गुजरात टायटन्स (१२.९० कोटी रुपये)
– राजस्थान रॉयल्स (१६.०५ कोटी रुपये)
– दिल्ली कॅपिटल्स (२१.८० कोटी रुपये)
– लखनऊ सुपर जायंट्स (२२.९५ कोटी रुपये)
– पंजाब किंग्ज (११.५० कोटी रुपये)
