Kamran Akmal says Virat Kohli and Rohit Sharma should visit Pakistan before retirement : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने भारतीय फलंदाज विराट कोहलीबाबत एक मोठा दावा केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंपेक्षा विराट कोहली पाकिस्तानमध्ये जास्त लोकप्रिय असल्याचे, कामरान अकमलचे म्हणणे आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी एकदा पाकिस्तान दौऱ्यावर येऊन येथील चाहत्यांना भेट द्यावी, असेही कामरान अकमलने म्हटले आहे. कारण यावरून विराट-रोहितला कळेल की पाकिस्तानी चाहते त्यांच्यावर किती प्रेम करतात.
रोहित-विराटने निवृत्तीपूर्वी पाकिस्तानला भेट द्यावी –
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कामरान अकमल म्हणाला, “विराट आणि रोहित यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी पाकिस्तानचा दौरा करावा. कारण हे दोघेही जागतिक क्रिकेटचे स्टार खेळाडू आहेत, जे क्रिकेट खेळण्यासाठी जगभर प्रवास करतात. प्रत्येक चाहता त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्या फलंदाजी आणि सामना ‘मॅच विनिंग कामगिरीमुळे पाकिस्तानमध्ये इतके चाहते आहेत, जितके इतर ठिकाणी पाहिलेल्यांपेक्षा जास्त आहेत.”
विराट जगभरातील अनेक लोकांसाठी आदर्श –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये झाली होती. तेव्हापासून, दोन्ही संघ केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आमनेसामने येतात. यावर अकमल म्हणाला, “विराट जगभरातील अनेक लोकांसाठी आदर्श आहे, रोहित हा विश्वचषक विजेता कर्णधार आहे आणि बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. जेव्हा विराट, रोहित आणि बुमराहसारखे खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर येतील, तेव्हा प्रत्येक चाहत्यामध्ये ती अनोखी भावना असेल. जेव्हा विराट त्याच्या अंडर-१९ संघासह पाकिस्तानला आला होता, पण तेव्हा तो इतका लोकप्रिय नव्हता.”
हेही वाचा – Sanjiv Goenka Rohit Sharma : रोहित शर्मासाठी लखनौ लावणार ५० कोटींची बोली? संजीव गोएकांनी केला खुलासा
पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जगातील कोणताही क्रिकेटर जास्त लोकप्रिय नाही –
माजी यष्टिरक्षक फलंदाज पुढे म्हणाला, “विराट आता पाकिस्तान दौऱ्यावर आला, तर त्याला त्याच्या लोकप्रियतेची खरी कल्पना येईल. त्याला पाकिस्तानमध्ये वेगळ्या प्रकारचा पाठिंबा मिळेल. पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जगातील कोणताही क्रिकेटर जास्त लोकप्रिय नाही. पाकिस्तानी चाहते विराट, रोहित आणि बुमराह यांच्यावर त्यांच्या क्रिकेट संघातील इतर खेळाडूंपेक्षा जास्त प्रेम करतात. त्यामुळे इतर क्रिकेटपटूंपेक्षा त्यांचे फॅन फॉलोअर्सही जास्त आहेत.”