KL Rahul Unique Record IND vs WI 1st Test: केएल राहुलने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. या शतकासह त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. केएल राहुलने तब्बल ३२११ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर घरच्या मैदानावर कसोटीत शतकी खेळी केली. राहुलचं हे कसोटीतील ११वं शतक आहे.

राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीत फक्त दुसरं शतक हे घरच्या मैदानावर झळकावलं आहे. पण शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच राहुल बाद झाला. ३३ वर्षीय राहुलने १०० धावा करून जोमेल वॉरिकनच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. राहुलने १९७ चेंडूत १२ चौकारांसह १०० धावा केल्या आणि शतक पूर्ण केलं. राहुलने त्याची लेक इवारासाठी या शतकानंतर खास सेलिब्रेशन केलं.

राहुलने सलग दुसऱ्या कसोटी डावात अगदी अचूक १०० धावांवर बाद होण्याचा विक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्ध जुलै महिन्यात लॉर्ड्स कसोटीतही त्याने १७७ चेंडूत बरोबर १०० धावा केल्या होत्या आणि त्यानंतर शोएब बशीरने त्याला बाद केलं होतं. त्या सामन्यातही राहुलने भारतासाठी पहिल्या डावात महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

केएल राहुलने घडवला इतिहास

लॉर्ड्स कसोटीत राहुलचं १०० धावांवर बाद होणं हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील नेमक्या १०० धावांवर बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये शंभरावं उदाहरण ठरलं होतं. अहमदाबाद कसोटीत राहुल पुन्हा नेमक्या १०० धावांवर बाद झाला.

मात्र या वेळी राहुलने एक वेगळाच विक्रम आपल्या नावावर केला. एका कॅलेंडर वर्षात दोनदा नेमक्या १०० धावांवर बाद होणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. एकूण पाहता, आपल्या कारकिर्दीत दोन किंवा त्याहून अधिक वेळा १०० धावांवर बाद होणारा राहुल हा सातवा खेळाडू ठरला आहे.

अचूक १०० धावांवर अनेकदा बाद होणारे फलंदाज

गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडिज) – २ वेळा – १९९७, १९८५
लेनॉर्ड हटॉन (इंग्लंड) – ४ वेळा – १९३८, १९३८
केविन पीटरसन (इंग्लंड) – २ वेळा – २००५, २००८
केएल राहुल (भारत) -२ वेळा – २०२५, २०२५
मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – २ वेळा – १९९८, १९९९
स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) – २ वेळा – १९९३, १९९९

कसोटी क्रिकेटला अधिकृतपणे १८७७ मध्ये सुरूवात झाली. तेव्हापासून कसोटीत एका वर्षात १००वर बाद होणारा राहुल पहिलाच फलंदाज आहे. १०० धावांवर दोनदा बाद होणाऱ्या यादीत ११ खेळाडूंमध्ये आहेत. ज्यात पंकज रॉय, बुधी कुंदरन, मोहिंदर अमरनाथ, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, दीप दासगुप्ता, वसीम जाफर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.