KL Rahul on IPL Owners: आयपीएलमध्ये संघाचं नेतृत्त्व करताना कोणत्या दबावात्मक परिस्थितीला सामोर जावं लागतं आणि अनुभव कसा होता, याबद्दल केएल राहुलने हल्लीच भाष्य केलं आहे. केएल राहुलच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. आयपीएल २०२४ दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असताना मालक संजीव गोयंका यांनी भर मैदानात सर्वांसमोर केएल राहुलला संघाच्या पराभवानंतर सुनावलं होतं, ही घटना आपल्या सर्वांनाच माहित आहे. पाहूया केएल राहुल नेमकं काय म्हणाला.
आयपीएल स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जास्त तणावपूर्ण असते, असं केएल राहुल म्हणाला. लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी सामन्यानंतर भर मैदानात केएल राहुलला सुनावल्यानंतर पुढील वर्षी तो या फ्रँचायझीपासून वेगळा झाला.
केएल राहुल जतिन सप्रूसह ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून मला सर्वात कठीण वाटणारी गोष्ट म्हणजे असंख्य आढावा मिटिंग होणं आणि मालकांना आपण घेतलेल्या निर्णयामागचं कारण काय हे सर्व स्पष्ट करणं. मी १० महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापेक्षा आयपीएलच्या अखेरीस मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जास्त थकलो होतो, हे मला जाणवलं.
राहुल पुढे म्हणाला, प्रशिक्षक आणि कर्णधारांना सतत अनेक प्रश्न विचारले जातात. काही काळानंतर, असं वाटतं की तुमची चौकशी केली जात आहे. “तुम्ही हा बदल का केला? तो खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये का होता? विरोधी संघाने २०० धावा कशा काय केल्या आणि आपण १२० धावाही करू शकलो नाही? त्यांच्या गोलंदाजांना इतका टर्न कसा मिळत आहे?”
“वर्षभर आम्हाला हे प्रश्न कधीच विचारले जात नाहीत, कारण प्रशिक्षकांना काय चाललंय हे माहित असतं. तुम्ही फक्त प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना उत्तर देण्यासाठी भाग असता, जे प्रत्यक्षात क्रिकेट खेळले आहे आणि खेळ ज्यांना समजतो. तुम्ही कितीही चांगलं काम केलं, कितीही आव्हानांना सामोरे गेलात तरी खेळात तुम्ही जिंकणारच याची हमी नसते. ज्यांना या खेळाचं ज्ञान नाही, त्यांनी हे सर्व समजावून सांगणं कठीण आहे,” असं केएल राहुल शेवटी म्हणाला.
तीन हंगामांसाठी लखनौ संघाचे नेतृत्व केल्यानंतर, राहुलने फ्रँचायझीची साथ सोडली. यानंतर २०२५ च्या महालिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला १४ कोटी रुपयांना विकत घेतलं. पण त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधारपद स्वीकारण्यास तयारी दर्शवली नाही. यानंतर आता आयपीएल २०२६ साठी केएल राहुलला दिल्ली संघाने रिटेन केलं आहे.
