भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर थोडा गोंधळ पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दिवसाची सुरुवात दमदार केली आणि सलग तीन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या. बेन स्टोक्स, शतकवीर जो रूट आणि ख्रिस वोक्स यांना बाद करून टीम इंडियाने इंग्लंडला अडचणीत टाकलं.

मात्र, या यशस्वी सुरुवातीनंतर भारतीय खेळाडूंचा पंचांशी चेंडूच्या स्थितीबाबत वाद झाला. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल दुसऱ्या दिवशी चेंडूच्या स्थितीवरून पंचांशी नाराजीने बोलताना दिसला. केवळ गिलच नाही, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजदेखील पंचांशी याच मुद्यावर वाद घालताना दिसला. त्याचबरोबर रवींद्र जडेजानेही चेंडू हातात घेताच नाराजी व्यक्त केली.

जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी सामना सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच इंग्लंडला ३ मोठे धक्के दिले. नवीन चेंडूनेही यामध्ये मोठी भूमिका बजावली, ज्यामुळे चेंडू स्विंग आणि सीम होण्यास मदत होत होती. सामन्याच्या पहिल्या दिवशी ८०.१ षटकांनंतर हा चेंडू घेण्यात आला होता. त्यामुळे नवीन चेंडू असल्याने तो बराच काळ टिकेल अशी अपेक्षा होती, परंतु ड्यूक्स चेंडूबद्दल उपस्थित केलेले प्रश्न यावेळीही खरे ठरले आणि फक्त १०.३ षटकं टाकल्यानंतर चेंडू बदलावा लागला.

इंग्लंडच्या डावातील ९१ व्या षटकात चौथा चेंडू टाकल्यानंतर, मोहम्मद सिराजने चेंडूच्या आकारात बदल झाल्याबद्दल पंचांकडे तक्रार केली. पंच सैकत शराफुद्दौला यांनी ताबडतोब त्यांच्या उपकरणांनी तो तपासला आणि चेंडूचा आकार बदलल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पंचांकडून चेंडू बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर चेंडूने भरलेल्या बॉक्समधून नवा चेंडू पंचांनी निवडला. पण हा चेंडू भारतीय संघाला देताच त्यावरून चर्चा सुरू झाली.

मात्र, भारतीय कर्णधार शुबमन गिल याला तो चेंडू स्वीकार्य वाटला नाही. गिलने थेट पंचांकडे जाऊन आक्षेप नोंदवला की दिलेला चेंडू १०-११ षटकं जुना नव्हे तर त्यापेक्षाही अधिक जुना आहे. नियमांनुसार, जेव्हा चेंडू बदलला जातो, तेव्हा त्याऐवजी मूळ चेंडूसारखाच जुना चेंडू दिला पाहिजे. पण पंचांनी गिलचा आक्षेप फेटाळून लावला आणि भारतीय कर्णधार यावर संतापला. गिलने रागाच्या भरात चेंडू दाखवत वाद घालू लागला. यानंतर पंचांनी गिलला उत्तर न देता सामना सुरू करण्याकडे लक्ष दिलं.

गिलच्या चर्चेनंतर चेंडू सिराजकडे पोहोचताच त्याने आणि आकाश दीपनेही त्यावर प्रश्न उपस्थित केले. सिराजही पंचांकडे गेला आणि म्हणू लागला की हा चेंडू १० षटकं जुना दिसत नाही, पण पंचांनी त्याला गोलंदाजी करण्यास सांगितलं. यादरम्यान, समालोचन करणारे माजी भारतीय कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही यावर प्रश्न उपस्थित केले.

गावस्कर यांनी स्पष्टपणे सांगितलं की टीम इंडियाला दिलेला चेंडू १० षटकं नव्हे तर २० षटके जुना चेंडू दिसत होता, कारण त्यात मागील चेंडूसारखी चमक नव्हती. त्यांनी पंचांच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. चेतेश्वर पुजाराने म्हटलं की या चेंडूच्या वापरानंतर भारतीय गोलंदाजांना पूर्वीसारखा स्विंग मिळत नव्हता. सातत्याने सर्व खेळाडूंनी पंचांशी चर्चा केल्यानंतर अखेरीस पंचांनी चेंडू तपासला आणि बदलून दिला.