चेन्नई : भारतीय संघाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यातच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर नमवणे अधिकच अवघड असेल, असे मत न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरने व्यक्त केले.

गतउपविजेत्या न्यूझीलंडच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले असून अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नई (दोन सामने) येथील वातावरण आणि खेळपट्टय़ांशी योग्यप्रकारे जुळवून घेतले आहे. न्यूझीलंडचा आता रविवारी धरमशाला येथे भारतीय संघाविरुद्ध सामना होणार आहे. भारतीय संघही अपराजित असल्याने या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सामन्यासाठी सँटनर उत्सुक आहे. 

हेही वाचा >>>IND vs BAN, World Cup 2023: विराट कोहलीने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर रवींद्र जडेजाची का मागितली माफी? जाणून घ्या कारण

‘‘धरमशाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. खेळपट्टीकडून चेंडूला वेग आणि उसळी मिळते. परंतु भारताविरुद्ध आमच्या सामन्यावेळी अशीच परिस्थिती असेल का हे पाहावे लागेल,’’ असे सँटनर म्हणाला.भारताचा कर्णधार रोहित शर्मा डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी करत असून त्याने अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावांची

(८४ चेंडूंत) आणि पाकिस्तानविरुद्ध ८६ धावांची (६३ चेंडूंत) उत्कृष्ट खेळी केली. त्यामुळे त्याला रोखणे न्यूझीलंडच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल असे सँटनरला वाटते. ‘‘पॉवर-प्लेची षटके अत्यंत महत्त्वाची ठरतील. रोहित भारताला आक्रमक सुरुवात करून देत आहे. परंतु आम्ही दडपण न घेता आमच्या कामगिरीवर लक्ष्य केंद्रित करणे आणि आतापर्यंत जे करत आहोत, तेच करत राहणे आवश्यक आहे,’’ असे सँटनरने सांगितले.