Mohsin Naqvi Returned Trophy: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत जेतेपदाचा मान पटकावला. या सामन्यात फार खास असं काही घडलं नव्हतं. पण सामना झाल्यानंतर जे घडलं, त्याची चर्चा गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून जेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि मेडल न देताच निघून गेले होते. हा ट्रॉफीवरून पेटलेला वाद सध्या तुफान चर्चेत आहे. दरम्यान मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली असल्याची माहिती समोर येत आहे.

आशिया चषकाचा अंतिम सामना झाल्यानंतर मंगळवारी(३० सप्टेंबर) आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मोहसीन नक्वी यांनी केलेल्या कृत्याचा जोरदार विरोध केला. नक्वी यांनी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन जाणं हा पदाचा गैरवापर आणि नियमांचं उल्लंघन असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आल्यानंतर आता मोहसीन नक्वी यांना झुकावं लागलं आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसीन नक्वी यांनी आशिया चषकाची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली आहे. पण ही ट्रॉफी भारतीय संघाच्या हाती कधी सोपवली जाणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही .
नक्वी यांनी आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर स्पर्धेच्या शिष्टचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मंगळवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकित बीसीसीआयकडून राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी सहभाग घेतला होता. या दोघांनी नव्की यांना धारेवर घेतलं. माध्यमातील वृत्तानुसार, या दोन्ही अधिकाऱ्यांनी नक्वी यांना स्पष्टपणे सांगितलं की, ही ट्रॉफी आशिया चषक विजेत्या भारतीय संघाची आहे. कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. यासह बीसीसीआयने नक्वी यांना आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचे औपचारीक अभिनंदन करण्यास देखील सांगितले. पण नक्वी यांनी अभिनंदन करण्यासही नकार दिला. त्यामुळे एसीसीने खेद व्यक्त केला आहे. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की, हा मुद्दा आता आयसीसीकडे नेला जाईल. नोव्हेंबरमध्ये आयसीसीची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाईल.