Mukesh Kumar Reveals About Meeting MS Dhoni For The First Time: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मुकेश कुमारने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही चांगली कामगिरी केली आहे. मुकेशला याच कारणामुळे टीम इंडियात स्थान मिळाले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी तो संघाचा भाग आहे. मुकेशला अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही. मुकेशने नुकतेच महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना त्यानी काय सल्ल दिली होता, याबद्दल सांगितले.
मुकेश कुमार आयपीएलमध्ये धोनीला पहिल्यांदा भेटला –
मुकेश कुमारने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, जेव्हा मी आयपीएलमध्ये एमएस धोनीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा दोघांमध्ये काय संभाषण झाले होते? मुकेश कुमारने सांगितले की, या भेटीत धोनीने त्यांना एक सल्ला दिला होता, ज्याचे त्याने पालन केले.
मुकेश म्हणाला, “मला नेहमीच धोनी भैया (महेंद्र सिंह धोनी) भेटायचे होते आणि काही गोष्टी विचारायच्या होत्या. आयपीएलमुळे हे शक्य झाले. मी त्याला विचारले की कर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून तू तुझ्या गोलंदाजांना काय सांगतोस?”
जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार नाही, तेव्हा तुम्ही शिकणार नाही –
मुकेश कुमार पुढे म्हणाला, “त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ‘मी माझ्या गोलंदाजांना सांगतो की जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार नाही, तेव्हा तुम्ही शिकणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचे आहे ते करा. जर तुम्ही काही केले नाही, तर तुम्ही शिकू शकणार नाही.’ त्याने निकाल विसरण्यास सांगितले आणि फक्त प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने गोष्टी समजावून सांगितल्या.”
भारताचा गोलंदाज पुढे म्हणाला, “मी दिल्ली कॅपिटल्सचा खूप आभारी आहे की त्यांनी मला संधी दिली. आयपीएलमध्ये हा अनुभव चांगला होता. इशांत भैयानेही खूप मदत केली. त्याने मला अनेक कोनातून चेंडू कसा टाकायचा हे सांगितले. त्याने मला माझी गोलंदाजी सुधारण्याचा सल्ला दिला.” मुकेश कुमारने आयपीएलमध्ये आतापर्यंत १० सामने खेळले असून या कालावधीत त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. २०२३ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.