रविवार विशेष : मुंबई क्रिकेटला नवसंजीवनी!

मुझुमदारचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हे पहिलेच वर्ष असल्याने त्याच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे.

mumbai-ranji
यंदा प्रथमच अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मुंबईच्या वरिष्ठ संघाने प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.

अन्वय सावंत

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ अशी मुंबईची ख्याती आहे. परंतु याच मुंबईला गेल्या काही हंगामांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत होते. तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईला २०१७नंतर या स्पर्धेत अंतिम फेरीचा टप्पाही गाठता आला नव्हता. यंदाच्या हंगामात मात्र वरिष्ठ संघासह विविध वयोगटांतील संघांनी चमकदार कामगिरी करताना उज्ज्वल भविष्याचे आशादायी चित्र निर्माण केले आहे.

यंदा प्रथमच अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मुंबईच्या वरिष्ठ संघाने प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे सी. के. नायडू स्पर्धेत मुंबईच्या २५ वर्षांखालील वयोगटातील संघाने जेतेपदावर कब्जा केला, तर कूचबिहार स्पर्धेत मुंबईच्या १९ वर्षांखालील वयोगटातील संघाने अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली.

मुंबई क्रिकेटला दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांची परंपरा आहे. मुझुमदारची केवळ मुंबई क्रिकेट नाही, तर भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना केली जाते. मुझुमदारने यापूर्वी खेळाडू आणि कर्णधार म्हणून मुंबईच्या रणजी विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, यंदा प्रथमच त्याच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या युवा खेळाडूंचा खेळ बहरल्याचे पाहायला मिळाले. परंतु अंतिम सामन्यात चंद्रकांत पंडित यांच्यासारख्या निष्णात आणि अनुभवी प्रशिक्षकापुढे मुझुमदारचे डावपेच कमी पडले. परिणामी मुंबईला मध्य प्रदेशकडून हार पत्करावी लागली आणि सहा वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे मुंबईचे स्वप्नही अधुरे राहिले. मुझुमदारचे मुख्य प्रशिक्षक म्हणून हे पहिलेच वर्ष असल्याने त्याच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्याने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे.

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूर यांसारखे प्रमुख खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत असल्याने ते संपूर्ण हंगामात मुंबईकडून खेळण्यास उपलब्ध नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत सलामीवीर पृथ्वी शॉ याला प्रथमच रणजीमध्ये कर्णधारपद भूषवण्याची संधी लाभली. पृथ्वीला (१० डावांत ३५५ धावा) फलंदाज म्हणून आपल्यातील प्रतिभेला न्याय देता आला नाही; पण कर्णधार म्हणून त्याने क्रिकेट जाणकारांना प्रभावित केले. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८च्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकाचे, तर मुंबईने २०२०-२१च्या हंगामात विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदा पृथ्वीने रणजी करंडकातही कर्णधार म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आणि सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज हे दोन्ही विक्रम मुंबईच्या खेळाडूंच्या नावावर होते. मुंबईचा २४ वर्षीय फलंदाज सर्फराज खानने सहा सामन्यांच्या नऊ डावांमध्ये तब्बल १२२.७५च्या सरासरीने ९८२ धावा फटकावल्या. यात एक द्विशतक, तीन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने अंतिम सामन्यातही आव्हानात्मक परिस्थितीत १३४ धावांची खेळी करत भारतीय कसोटी संघातील स्थानासाठी दावेदारी अधिक भक्कम केली. गोलंदाजीत डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने सहा सामन्यांच्या ११ डावांमध्ये सर्वाधिक ४५ गडी बाद करण्याची किमया साधली.

त्याचप्रमाणे सी. के. नायडू करंडक विजेत्या संघाचा कर्णधार हार्दिक तामोरे, पदार्पणात द्विशतक साकारणारा सुवेद पारकर, प्रतिभावान अरमान जाफर, उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल यांसारख्या युवा फलंदाजांनी रणजीमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले. मात्र, एकीकडे या सकारात्मक गोष्टी असतानाच दुसरीकडे मुलानी वगळता अन्य गोलंदाजांना तितकासा प्रभाव पाडता न येणे, क्षेत्ररक्षणाचा स्तर खालावणे, तसेच मर्यादित षटकांच्या स्पर्धाची बाद फेरीही न गाठणे, हे मुंबईसाठी चिंतेचे विषय ठरले.

मुझुमदारने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेताना मुंबईच्या गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा आणि युवा वेगवान गोलंदाजांची दुसरी फळी निर्माण करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. मात्र, अजूनही कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेला धवल कुलकर्णी आणि दुखापतींशी झगडणारा तुषार देशपांडे यांना पर्याय शोधण्यात मुंबईचा संघ अपयशी ठरतो आहे. तसेच अंतिम सामन्यात झेल सोडणे मुंबईला महागात पडल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टींवर अधिक लक्ष दिल्यास मुंबईचा संघ पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करू शकेल, यात तिळमात्र शंका नाही.

सुधारणेला बराच वाव!

मुंबईच्या विविध वयोगटांतील संघांनी अंतिम फेरी गाठणे ही समाधानकारक बाब असली, तरी सुधारणेला बराच वाव आहे. रणजी करंडकात मुंबईचा संघ बऱ्याच वर्षांनी अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, साखळी फेरीत त्यांना केवळ तीन सामने खेळावे लागले, तर बाद फेरीतही मुंबईपुढे तुल्यबळ म्हणता येतील असे संघ नव्हते. अंतिम फेरीत चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील मध्य प्रदेशविरुद्ध मुंबईच्या संघातील मर्यादा प्रकर्षांने दिसून आल्या. त्यामुळे पुन्हा रणजी करंडकावर नाव कोरण्यासाठी मुंबईला अजून बरीच सुधारणा करावी लागणार आहे. विशेषत: गोलंदाजांचे पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे. शम्स मुलानीचा अपवाद वगळता मुंबईचे गोलंदाज झगडताना दिसले. फलंदाजांनाही मोक्याच्या क्षणी खेळ उंचावता आला नाही.

– सुलक्षण कुलकर्णी, मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

anvay.sawant@expressindia.com

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai cricket team performance in ranji final 2022 zws

Next Story
IND vs ENG 5th Test Match : स्टुअर्ट ब्रॉडने घेतली कुंबळे आणि वॉर्नच्या क्लबमध्ये एंट्री! अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा दुसराच गोलंदाज
फोटो गॅलरी