बंगळूरु : मुंबई इंडियन्सला सलग अकराव्यांदा ‘आयपीएल’च्या हंगामातील पहिला सामना गमवावा लागला. संघाची ही कामगिरी निश्चितच निराशाजनक आहे, असे मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉण्ड यांनी सांगितले. मुंबई इंडियन्स ‘आयपीएल’मध्ये २०१२ मध्ये चेन्नईविरुद्ध सलामीचा सामना जिंकले होते. त्यानंतर आजपर्यंत एकाही हंगामात मुंबई इंडियन्सला विजयी सलामी मिळालेली नाही.
‘‘मुंबई इंडियन्ससाठी माझा हा नववा हंगाम आहे. आम्ही अजून सलामीचा सामना जिंकू शकलेलो नाही. हे निराशाजनक आहे. एखाद्या मोठय़ा स्पर्धेची सुरुवात विजयाने होणे हे केव्हाही चांगले असते, पण आम्हाला ते अजून जमलेले नाही. यातून मार्ग काढायलाच हवा,’ असे बॉण्ड म्हणाले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बॉण्डने बंगळूरुचा गोलंदाज मोहम्मद सिराजचे तोंडभरून कौतुक केले. ‘‘सिराजची गोलंदाजी कमालीची भेदक होती. त्याने आमच्या फलंदाजांना थोडीशीही संधी दिली नाही. सिरण्च्या उसळून आलेल्या चेंडूंचा सामना करणे आव्हानात्मक होते. त्याचे उसळते चेंडू आमच्या फलंदाजांना खेळावे लागले,’’ असे बॉण्ड यांनी सांगितले.