लोझान : भारतात होणाऱ्या कुमार गटाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यावर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) त्यांच्या जागी ओमानचा समावेश करण्यात आल्याची माहिती बुधवारी दिली.

ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत चेन्नई आणि मदुराई येथे रंगणार आहे. गेल्या वर्षीच्या कुमार आशिया चषक स्पर्धेत पाकिस्ताननंतर सर्वोच्च स्थानावर असलेला संघ म्हणून ओमान आता विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धा त्रयस्थ केंद्रावर खेळवण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळल्यानंतर ‘एफआयएच’ने हा निर्णय घेतला.

या स्पर्धेत प्रथमच महिला आणि पुरुष यांच्या प्रत्येकी २४ संघांचा सहभाग असेल. भारतात होणाऱ्या सलग दुसऱ्या स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली आहे. यापूर्वी पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. कुमार विश्वचषकासाठी पाकिस्तानला भारत, चिली, स्वित्झर्लंडसह ‘ब’ गटात स्थान देण्यात आले होते.

पहलगाम येथे झालेल्या दहशतलवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशातील संबंध बिघडले आहेत. याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने माघार घेतली. भारतानेही पाकिस्तानशी बहुराष्ट्रीय स्पर्धा वगळता द्विपक्षीय सामने खेळण्यास निर्बंध घातले आहेत. परंतु २०३० सालची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात झाल्यास पाकिस्तान संघाला त्यात खेळण्यापासून रोखले जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.