Batsmans Who Scored Century In Asia Cup T20 Format: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबरला युएईविरूद्ध रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १४ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा पाहता ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. दरम्यान केवळ २ असे फलंदाज आहेत, ज्यांना आशिया चषकातील टी-२० फॉरमॅटमध्ये फलंदाजी करताना शतकं झळकावता आली आहेत. कोण आहेत ते २ फलंदाज? जाणून घ्या.

आशिया चषकात केवळ विराट कोहली आणि बाबर हयात या दोघांना शतकं झळकावता आली आहेत. या दोन्ही फलंदाजांच्या नावे १२२ धावांची खेळी करण्याचा विक्रम आहे. विराट कोहलीने ८ सप्टेंबर २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात ही शतकी खेळी केली होती. तर बाबर हयातने हाँगकाँगकडून खेळताना ओमानविरूद्ध झालेल्या सामन्यात दमदार शतकी खेळी केली होती.

अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली होती. या दोघांनी मिळून १२.४ षटकात ११९ धावां जोडल्या. केएल राहुल ४१ चेंडूत ६२ धावांची खेळी करत माघारी परतला. तर कोहलीने १२२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २१२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा डाव १११ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते.

तर या स्पर्धेत दुसरं शतक झळकावणारा फलंदाज म्हणजे बाबर हयात. बाबरने हाँगकाँग संघाकडून खेळताना ओमानविरूद्ध झालेल्या सामन्यात १२२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात ओमानचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना ओमानने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८० धावा केल्या होत्या. ओमानकडून जतिंदर सिंगने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. हाँगकाँग संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला १७५ धावांपर्यंत मजल मारता आली. हाँगकाँगने हा सामना गमावला, पण बाबर हयातच्या खेळीने सर्वांचं मनोरंजन केलं.