Shreyas Iyer’s reaction after losing the title in world cup 2023: टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अय्यरने संपूर्ण स्पर्धेत शानदार फलंदाजी केली, परंतु अंतिम फेरीत तो काही विशेष करू शकला नाही आणि केवळ चार धावा करून बाद झाला. फलंदाजांच्या अपयशामुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली आणि २४० धावांवर गारद झाली. तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. जेतेपद हुकल्यानंतर अय्यरने सांगितले की, ही वेदना दूर होण्यास बराच वेळ लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस अय्यरने एक्सवर लिहिले, “आमची ह्रदये तुटली आहेत. आमचा अजूनही विश्वास बसत नाही की, विश्वचषक गमावला आहे. ही वेदना दूर व्हायला बराच वेळ लागेल. पण माझ्या पहिल्या विश्वचषकात मी खूप काही शिकलो. आजपर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे. मला बीसीसीआय, संघ व्यवस्थापन, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. या अद्भुत प्रवासासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन.”

अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने दिलेले २४१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियन संघाने चार गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियासाठी १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली, ज्याच्या जोरावर कांगारूंनी सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्याचबरोर मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – आयसीसीकडून सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन जाहीर, चॅम्पियन कर्णधाराला मिळाले नाही स्थान; भारताच्या ६ खेळाडूंचा समावेश

यापूर्वी २००३ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता पुन्हा कांगारूंनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत केले. ऑस्ट्रेलियन संघाने २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही टीम इंडियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – पॅट कमिन्स विश्वचषक ट्रॉफीसह पोहोचला साबरमती नदीच्या काठावर, आलिशान क्रूझवर काढले फोटो, पाहा VIDEO

कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our hearts are broken we still cant believe it shreyas iyers reaction after losing the title in world cup 2023 vbm