पाकिस्तान आणि भारताचे संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणलेले आहेत. याचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. क्रीडा जगतातलं एक उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. आफ्रिकेचा संघ या दौऱ्यात २ टेस्ट, ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. सर्वसाधारणपणे ही मालिका जगभरात सगळीकडे प्रसारित होते. मात्र पाकिस्तानचा सहभाग असल्यामुळे भारतात कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलवर ही मालिका प्रसारित होत नाहीये. विशेष म्हणजे कोणत्याही ओटीटी अॅपवरही हे सामने भारतात प्रसारित होत नाहीयेत. पाकिस्तानविरुद्ध शत्रूत्वामुळे आफ्रिकेच्या संघाचा खेळ पाहण्याची भारतीय संघाची संधी हिरावून घेण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे असंख्य चाहते भारतात आहेत. पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी कशी होतेय हे पाहायला त्यांच्या भारतीय चाहत्यांना नक्कीच आवडलं असतं. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र भारतात हे सामने कुठल्याही टीव्ही चॅनेलवर दिसणार नाहीत. ओटीटी अॅपवरही हे सामने पाहता येणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचा खेळ पाहण्यास जगभरातले त्यांचे चाहते उत्सुक असणं साहजिक आहे मात्र भारत-पाकिस्तान द्वंद्वांचा फटका या मालिकेला बसला आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान एकदा नव्हे तर तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळले. हे सामने भारतासह जगभर दिसले. या सामन्याच्या प्रक्षेपणातून प्रचंड पैसा आशियाई क्रिकेट परिषदेला मिळाला. हे सामने प्रसारित करणाऱ्या चॅनेललाही घसघशीत फायदा झाला. वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना कोलंबोत खेळवण्यात आला. या सामन्यालाही टीव्हीवर हजारो चाहत्यांनी पसंती दिली.

जिओ हॉटस्टार, सोनी, अमेझॉन प्राईम, फॅनकोड अशा कोणत्याही अॅपवर ही मालिका दिसत नसल्याने असंख्य चाहत्यांचा हिरमोड झाला. ही मालिका फॅनकोड अॅपवर दिसेल अशा बातम्या असंख्य वेबसाईट्सनी दिल्या आहेत मात्र प्रत्यक्षात फॅनकोड अॅपवर या मालिकेचा मागमूसही नाही. फॅनकोडवर अफगाणिस्तान-बांगलादेशचं थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे मात्र या मालिकेचं नाही.

लाहोर कसोटी निर्णायक स्थितीत

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल हक आणि सलमान अली अघा यांनी प्रत्येकी ९३ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने ७६ धावांची खेळी केली. या तिघांच्या अर्धशतकांच्या बळावर पाकिस्तानने ३७८ धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे सेनुरन मुथूसामीने ६ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २६९ धावांतच आटोपला. टोनी द झोरीने १०४ धावांची एकाकी झुंज दिली. रायन रिकलटनने ७१ धावा करत त्याला चांगली साथ दिली मात्र या दोघांचा अपवाद वगळता आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानला १०९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. पाकिस्तानकडून नोमन अलीने ६ तर साजीद खानने ३ विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेने शिस्तबद्ध गोलंदाजी करत पाकिस्तानचा दुसरा डाव १६७ धावांतच गुंडाळला. बाबर आझम (४२) आणि अब्दुल्ला शफीक (४१) यांचा अपवाग वगळता बाकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. आफ्रिकेतर्फे सेनुरन मुथूसामीने ५ तर सिमोन हार्मेरने ४ विकेट्स पटकावल्या.

दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७७ धावांचं लक्ष्य मिळालं. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण आफ्रिकेची स्थिती ५१/२ अशी आहे. पाचव्या आणि अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी २२६ तर पाकिस्तानला ८ विकेट्सची आवश्यकता आहे. दोन्ही संघांनी जिंकण्याची समान संधी असून मुकाबला चुरशीचा होणार हे नक्की.

दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यात २ टेस्ट, ३ टी२० आणि ३ वनडे खेळणार आहे.

भारत-पाकिस्तान वादाची किनार

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक लष्करी कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धव्स्त केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामने होणार का याविषयी साशंकता होती. मात्र आयसीसी तसंच आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित स्पर्धांमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी खेळेल असं धोरण केंद्र सरकारने जाहीर केलं. भारतीय संघाने युएईत झालेल्या आशिया चषकात तीनपैकी तिन्ही सामन्यात पाकिस्तानला नमवलं. अंतिम लढतीतही पाकिस्तानला नमवत भारताने जेतेपदावर नाव कोरलं.

यानंतर वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाला. भारताच्या पुरुष तसंच महिला संघाने पाकिस्तान संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळलं. या निर्णयावर पाकिस्तानने तीव्र निषेध नोंदवला. आशिया चषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक घेण्यास भारतीय संघाने नकार दिला. नक्वींऐवजी अन्य कुणाच्या हस्ते करंडक स्वीकारण्याची भारताची तयारी होती पण नक्वी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी करंडक स्वत:च्या हॉटेलमधील खोलीत नेला. अंतिम लढतीनंतर जवळपास दीड तास भारतीय संघ ट्रॉफी मिळण्याच्या प्रतीक्षेत होता. अखेर याप्रकरणी तोडगा निघाला नाही आणि भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलं. भारतीय संघाने विनाकरंडक विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर विनाकरंडक भारतीय संघ मायदेशी परतला. नक्वी यांनी तूर्तास हा करंडक आशियाई क्रिकेट परिषदेच्या दुबईस्थित कार्यालयात ठेवला असून, त्यांच्या परवानगी विना कोणालाही तो सुपुर्द करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.